
शिवसेनेने द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देणे अनाकलनीय!
मुंबई, ता. १२ ः खासदारांच्या आग्रहामुळे राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा हा निर्णय अनाकलनीय असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. महाविकास आघाडीत असताना शिवसेनेने घेतलेला हा निर्णय का फिरवला, हे समजत नाही. आम्हाला या संदर्भात विश्वासातही घेतले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला, त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले नाही; मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय, ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, असे थोरात म्हणाले.
---
शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात; मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले, तेव्हा शिवसेनेने अशी भूमिका घेणे अनाकलनीय आहे.
- बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88791 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..