
शाळा ठरतायेत कोंडीची ठिकाणे
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : कोपरखैरणे विभागात शाळा भरण्याच्या, सुटण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अनेक नामांकित शाळा व महाविद्यालये असल्याने हा परिसर नवीन शैक्षणिक हब म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, दुकानदार वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता कोपरखैरणेला वाहतूक कोंडीचा परिसर असे ओळखले जाऊ लागले आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर सर्व शाळा, महाविद्यालये जोमाने सुरू झाली आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढलेली आहे, परंतु शाळा सुटताना किंवा भरताना शाळेभोवती होणारी वाहतूककोंडी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच कोपरखैरणे परीसरातील सेक्टर १४ मधील रिलायन्स स्कूल, सेक्टर १० सेंट मेरी स्कूल, सेक्टर आठमधील रा. फ. नाईक विद्यालय, सेक्टर सहामधील नॉर्थ पॉइंट स्कूल, सेक्टर १७ मध्ये ज्ञानविकास हायस्कूल या शाळांबाहेर मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांच्या खासगी गाड्या, शालेय मुलांना ने-आण करणाऱ्या बसची वाढती संख्या, खासगी वाहनांच्या गर्दीमुळे शाळेच्या आवाराभोवती मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. किमान तासभर या वाहतूककोंडीत पालकवर्ग व इतर नागरिक अडकून पडतात. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांना निवेदन देण्यात आले.
नागरिकांना अगोदरच शाळेच्या परिसरातून वाट काढताना दमछाक झालेली असते. येथील रस्त्यावरील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने पालक वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच शाळा प्रशासनाने स्कूल बस, व्हॅन, तसेच पालकांच्या वाहनांसाठी शाळेच्या मैदानात तात्पुरती पार्किंगची व्यवस्था करावी, असेही घोरपडे यांनी म्हटले आहे.
पालकांकडून मोठ्या वाहनांचा वापर
खासगी वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून केली जाणारी वाहतूक, दुचाकी अथवा चारचाकी वाहनांतून मुलांना सोडण्यासाठी आलेले पालक, कर्कश हॉर्न वाजवून कोंडी करणाऱ्या शाळांच्या बस यामुळे शाळांबाहेर होणाऱ्या वाहतुकीची समस्या कायम आहे. अनेक पालक पाल्याला ने-आण करण्यासाठी कार आणतात. त्यामुळे गर्दीत आणखीनच भर पडत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण उपसंचालक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, पालक आणि स्कूल बस व्यावसायिकांची संयुक्तपणे बैठक घेतल्यास वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढणे सहज शक्य आहे.
- प्रसाद घोरपडे, शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कोपरखैरणे परिसरातील सगळ्या शाळांना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत. याशिवाय शाळांमधील मुख्याध्यापकांसोबत बैठक झालेली आहे. तसेच प्रत्येक शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी फोडली जाईल.
- उमेश मुंढे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग, कोपरखैरणे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88800 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..