मिरा भाईंदर नगरपालिका बांधणार पाचशे कोटींचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदर नगरपालिका बांधणार पाचशे कोटींचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते
मिरा भाईंदर नगरपालिका बांधणार पाचशे कोटींचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते

मिरा भाईंदर नगरपालिका बांधणार पाचशे कोटींचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील डांबरी रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि पावसाळ्यात त्यांना पडणारे खड्डे या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचा प्रस्ताव आहे आणि यासाठी खासगी बँका महापालिकेला कर्ज उपलब्ध करून देण्यास तयार झाल्या आहेत. त्यामुळे खासगी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे.

मिरा-भाईंदर शहरातील अनेक रस्ते खूप जुने झाले आहेत. पावसाळ्यात त्यांना वारंवार खड्डे पडत असतात. सध्या शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील एकंदर ७० रस्त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. रस्ते बांधणीच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे. महापालिकेने आतापर्यंत शहरातील २५ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे आणि त्यासाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचे कर्ज एमएमआरडीएकडून घेतले आहे. त्यामुळे आता बांधायच्या रस्त्यांसाठी पुन्हा एमएमआरडीएकडून कर्ज मिळणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने खासगी बँकांना कर्जाचा प्रस्ताव दिला असता तीन खासगी बँकांनी महापालिकेला कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. या बँकांच्या कर्जाचा व्याजदर एमएमआरडीएच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा कमी आहे.

पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे; मात्र खासगी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी महापलिकेला राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे प्रशासनाने त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. रस्ते काँक्रीटचे झाल्यानंतर नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्ती मिळेल.
- दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महानगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88848 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..