
सौंदर्याने नटलेला विक्रमगड
विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) ः पावसाळा सुरू झाला की सगळीकडेच हिरवळ दाटते. डोंगरच्या डोंगर हिरवा शालू नेसून उभे असल्यासारखेच भासतात. हे मोहक दृष्य पाहण्यासाठी व कॅमेऱ्यात टिपण्यासाठी निसर्गप्रेमी नेहमीच विक्रमगड तालुक्याला भेट देतात. हे दृष्य अधिक लोभसवाणे दिसते ते पावसाळ्यात. येथील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे भेट देत असतात. विक्रमगडचा पलूचा धबधबा प्रसिद्ध असून पर्यटक येथेही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात.
विक्रमगड तालुका हा पालघर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. या तालुक्याचा बराचसा भाग जंगलव्याप्त डोंगराळ दऱ्याखोऱ्याचा आहे. पूर्वेला जव्हारचा घाट, सह्याद्रीच्या रांगांतील वतवड्याचा सुळका दिसतो. नैर्ऋत्येला कोहोज किल्ला दिसतो. महालक्ष्मी डोंगराच्या अलीकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो. या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खोऱ्यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. विक्रमगड तालुक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतू प्रकर्षाने जाणवतात. जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांमध्ये पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. येथे भातशेतीबरोबरच डोंगराळ भागात नागली, वरई व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात.
विक्रमगडमध्ये पिंजाळ नदीवरील श्री पंतगेश्वराचे महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. पांडवकालीन श्री नागेश्वर मंदिर हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे. जांभे गावाजवळ पलूचा धबधबा प्रसिद्ध आहे. तसेच पश्चिमेस साधारण ४५ कि.मी. अंतरावर अरबी समुद्राचा किनारा आहे. विक्रमगड तालुक्यातून मुख्यता देहर्जे, पिंजाळ, सूर्या आणि राखाडी नद्या वाहतात. सूर्या नदीवर धामणी व कवडास धरणांची कामे झालेली आहेत. धामणी येथे सूर्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विक्रमगड तालुक्याचा बहुतांश भूप्रदेश हा समतल असून जमीन मुख्यतः जांभ्या खडकापासून बनलेली आहे. तालुक्यातील जांभे या गावाजवळ मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर नौसर्गिक पलूचा धबधबा असून पावसाळ्याच्या दिवसांत येथे पर्यटकांची वर्दळ असते.
---------
असे पडले विक्रमगड नाव
पूर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नाव होते. कुडाण हे गाव त्या काळी परकीयांना अटकाव करण्यासाठी संरक्षण भिंतीप्रमाणे कार्य करत होते. या कुडाण गावामध्ये संस्थांनाधिपती विक्रमशहा महाराज यांनी आले पूर्वीचे ठाणे मलवाडा येथे स्थलांतरित केले. त्यामुळे कुडाण या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १० डिसेंबर १९४७ रोजी कुडाण या गावाचे विक्रमगड असे नामकरण केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88874 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..