
भिवंडीत दोघा भावांचा बुडून मृत्यू
भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : नातेवाईकांसोबत पोहण्यास गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिंबीपाडा वारणा नदीत मंगळवारी (ता. १२) सायंकाळी घडली. इम्रान रईस मन्सुरी (२०), सुफीयान रईस मन्सुरी (१६) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील भोईवाडा परिसरात राहणारे हे दोघे भाऊ नातेवाईकांसोबत चिंबीपाडा येथील वारणा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यापैकी इम्रानला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्यामुळे सुफियान त्यास वाचवण्यासाठी गेला; मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. नातेवाईकांनी आरडाओरड केली असता स्थानिकांनी दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रात्री शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बारोटे करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88935 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..