
पदपथांसाठी पालिकेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईच्या पदपथांवर चालताना पावलोपावली अडथळ्यांमुळेच हा पर्याय वापरणे नकोसे होते. अशा वेळी सरसकट विनाअडथळा पदपथ चालायला मिळाला, तर कुणाला नको असेल? मुंबई शहरातील विविध वॉर्डमध्ये पदपथावर चालणे सुकर व्हावे, यासाठीच पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगले पदपथ मिळतानाच त्यावर चालण्यासाठीचेही अडथळे हटवण्याचा मानस मुंबई महापालिकेचा आहे. याचाच भाग म्हणून नागरिकांनाही पदपथांशी संबंधित तक्रारी करण्याची संधी आगामी काळात मिळणार आहे. नागरिकांना आपल्या भागातील हरवलेले पदपथही यानिमित्ताने पालिकेच्या लक्षात आणून देता येतील. त्यासोबतच अतिक्रमण किंवा अडथळा करणाऱ्या पदपथांच्या भागाची तक्रारही महापालिकेकडे करता येणार आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून आम्ही मुंबई शहराअंतर्गत असणाऱ्या पदपथांचा काही भाग हा स्वतः चालत जाऊन अनुभवतो आहोत. त्यामध्ये चालण्यात नेमक्या काय अडचणी आहेत, याची पडताळणी करण्यात येत आहेत. त्यासाठी आठवड्यातील प्रत्येक बुधवारी आम्ही स्वतः चालत जाऊन ग्राऊंड झिरो परिस्थितीचा अनुभव घेतो आहोत. त्यामुळेच फूटपाथशी संबंधित नेमके काय विषय आणि अडचणी आहेत, ही गोष्ट शोधण्यासाठी आम्हाला मदत झाली आहे. ज्या ठिकाणी फूटपाथ मिसिंग आहे, अशा ठिकाणी रस्ते विभागाकडून तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या पदपथांचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचना आम्ही वॉर्ड पातळीवर दिल्या आहेत,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली. पदपथाच्या डेटाबेसची निर्मिती तयार करतानाच तंत्रज्ञानाचाही आधार घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘आतापर्यंत मुंबईत पदपथांशीसंबंधी अनेकदा पुढाकार घेण्यात आला; पण नागरिकांना चालणे तितकेसे सोपे नाही, असाच सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव आहे. म्हणूनच आमच्याकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. डेटाबेस तयार व्हावा. तसेच पडताळणीच्या माध्यमातून अतिक्रमण आणि कोणतेही अडथळे नसलेले पदपथ नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. सुरुवातीला एका वॉर्डमध्ये ही संकल्पना राबवून संपूर्ण शहरातील वॉर्डमध्ये प्रभावीपणे कशी अंमलात आणता येईल, हाच आमचा प्रयत्न राहील,’ असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
...
नागरिकांना तक्रारीचा पर्याय देणार!
सध्या मुंबईकरांच्या सोयीसाठी खड्ड्यांच्या तसेच नालेसफाईच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तक्रारीची सुविधा आहे. सध्या अशी सुविधा पदपथांच्या बाबतीत उपलब्ध नाही. त्यामुळे मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा वेबसाईट तसेच समाजमाध्यमांच्या वापराच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय हा पदपथांशी संबंधित कोणतीही तक्रार करण्यासाठी मिळावा, हा आमचा प्रयत्न राहील. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारीची माहिती ट्रॅक करता येणेही महत्त्वाचे असल्याचे शर्मा म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88971 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..