कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : ठाणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका भाज्यांसोबत वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. वाशी मार्केटमधील भाज्यांची आवक एकीकडे वाढली असताना कल्याणमधील भाज्यांची आवक मात्र घटल्याचे दिसत आहे.
पुणे, नाशिक, मुरबाड आदी भागांतून कल्याणच्या बाजारात भाज्या येतात; परतु पावसामुळे माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्याच्या घडीला १५० भाज्यांचे ट्रक येत आहेत. भाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली असून, श्रावणात हे दर आणखी चढे होतील, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

कल्याणच्या मार्केटमध्ये उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नारायणगाव, नाशिक, घोटी, ओतूर, जुन्नर, पुणे या भागांतून भाजीपाला पुरवठा होतो. पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतूनदेखील भाज्यांची आवक होते. मात्र, गुजरात राज्यात काही जिल्ह्यांत पूरपरिस्थिती आहे. याचा फटका भाज्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतातील भाज्यांचे नुकसान झाले आहे.

माळशेज घाटात दरड कोसळल्याने त्याचा फटका मालवाहतुकीला बसला होता. या सर्वांचा परिणाम म्हणून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. येथील मार्केटमध्ये आधी २५० ते ३०० गाड्यांची आवक होत होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून १५० गाड्यांचीच आवक बाजारात होत आहे. पावसाने भाज्या खराब होणे, तसेच भाज्यांची वाहतूक करण्याची जोखीम वाहनचालक स्वीकारत नाहीत. माल खराबच होणार असल्याने व्यापारीही मालाची खरेदी करत नसून आवक अधिकाधिक घटल्याचे व्यापारी किसन दांगट सांगतात. सोमवारपासून बाजारात भाज्यांची आवक कमी होत असून, अजूनही मालाची आवक वाढलेली नाही. यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

रानभाज्यांना पसंती....
ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळतात आणि त्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे. पावसाळा सुरू झाला, की बाजारात रानभाज्या दिसायला लागतात. विशेष म्हणजे या भाज्या कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. कोणतही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातील पर्वणीच असते. या रानभाज्या मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळे, या ठिकाणी आढळतात. या भागातील आदिवासी मुंबईच्या इतर भागात येऊन या भाज्या विकतात. या भाज्या पौष्टिक आणि औषधी असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत. पावसामुळे या भाज्यांची आवक देखील जास्त नसली, तरीही त्याला ग्राहकांची पसंती असल्याचे दिसते.


कल्याण एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचे घाऊक दर...

कोथिंबिर - ६० रु. जुडी

मेथी - ४० रु. जुडी

भेंडी - ७० रु. किलो

सिमला मिरची - ३० रु. किलो

गवार - ७० रु. किलो

फरसबी - ८० रु. किलो

वाटाणा - १४० रु. किलो

दोडका - ६० रु. किलो

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88994 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..