
तापसरीच्या रुग्णांत वाढ
वाशी, ता. १४ (बातमीदार) : कोरोनाच्या चौथ्या लाटेत काही दिवसांत ४५० पर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आता ५० पर्यंत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांतही मोठी घट झाली असल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांत घट होत असली, तरी ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
नवी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर दोन ते तीन महिने करोना रुग्णसंख्या एकअंकी होती. पालिकेच्या कोरोना काळजी केंद्रात प्रत्यक्षात एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता. त्यामुळे सर्व आरोग्य व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली होती. जे काही रुग्ण सापडत होते ते लक्षणविरहित असल्याने घरीच उपचार घेत होते; मात्र २५ मेपासून शहरात दैनंदिन करोना रुग्णांत वाढ सुरू झाली होती. एक अंकी असलेली रुग्णसंख्या पुढील १५ दिवसांतच दोनशेपर्यंत गेली होती. या काळात करोना मृत्यूही होत नव्हते; मात्र नंतर करोना मृत्यूचे प्रमाणही वाढ गेले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने आवश्यक त्या आरोग्य सुविधांची तयारी केली होती.
दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या घरापर्यंत पोहोचली होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्या घटू लागली आहे. मागील १५ दिवसांत रुग्णसंख्या घटत आता दैनंदिन ५० पर्यंत रुग्ण सापडत आहेत. वाढत्या तापसरीच्या रुग्णांमुळे नागरिकांनी कुटुंबाची व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील कोरोना आकडेवारी
कोरोना चाचण्या ३७,०७,४७२
कोरोनाबाधित १,५९,४३५
कोरोनामुक्त १,३४,६४५३
मृत्यू २,०५२
ताप, सर्दीचे रुग्ण अधिक
मागील १० दिवसांपासून शहरात सातत्याने पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. ताप, सर्दी-खोकला झाला तरी कोरोना असल्याची भीती नागरिकांना वाटत आहे. या साथीच्या आजारांमुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89028 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..