
एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबचा अदानीकडून ताबा?
मुंबई, ता. १४ : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या प्रवेशद्वार क्रमांक ८ जवळील ‘एअर इंडिया स्पोर्टस क्लबच्या मैदानावर अदाणी समूहाने ‘प्रवेशबंदी’चा फलक लावला होता. तसेच बॅरिकेट्स लावत सदर जागा आमच्या अधिकार क्षेत्रात असल्याचाही दावा केला होता; मात्र एअर इंडिया कॉलनी बचाव समितीकडून जोरदार विरोध केला. एअर इंडिया स्पोर्ट क्लबचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अदाणी समूहाकडून ही कृती चुकीची असल्याची माहिती एअर इंडिया कॉलनी बचाव समितीचे एम. पी. देसाई यांनी ‘सकाळ’ला दिली.
केंद्र सरकारने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाची जबाबदारी अदाणी समूहाकडे दिली आहे. तसेच एअर इंडिया स्पोर्ट क्लबच्या जागेच्या विकासाची जबाबदारीही अदाणी समूहाला दिल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र याबाबत लेखी कागदपत्रे नसतानाही अदाणीकडून मैदानावर हक्क बजावल्याचा दावा करण्यात येत आहे. अदाणी समूहाच्या सुरक्षारक्षकांनी बुधवारी (ता. १३) भरपावसात मैदानात ‘नो एण्ट्री’चे फलक आणि बॅरिकेट्स लावले. तसेच मैदानात कोणीही येऊ नये असे सांगण्यात आल्याचे बचाव समितीचे पदाधिकारी एम. पी. देसाई यांनी सांगितले.
---
पोलिसांकडे तक्रार
या घटनेनंतर एअर इंडिया कॉलनी बचाव समितीकडून वाकोला पोलिस ठाण्यात तसेच एअर इंडियाचे विभागीय संचालक रवी बोधाडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून वाकोला पोलिसांनी मैदानावर लावलेले फलक आणि बॅरिकेट्स काढले. अदाणी समूहाशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेण्यात येईल असे सांगितले.
....
एअर इंडिया स्पोर्ट क्लबच्या मैदानाच्या विकासाची जबाबदारी केंद्र सरकारने आम्हाला दिल्याचा अदाणी समूहाकडून दावा केला जात आहे; मात्र त्यांच्याकडे लेखी पुरावे नाहीत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मैदानावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे.
- के. श्रीनिवासुलू, अध्यक्ष, एअर इंडिया कॉलनी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89048 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..