
ठाणे शहरातील सरकारी कार्यालयांना मिळणार नवी झळाळी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ ः ठाणे शहरातील उड्डाणपूल, फूटपाथशेजारील भिंतींवर चित्र रेखाटून सुशोभीकरण करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. शहरातील सर्व सरकारी इमारती आणि पादचारी पुलांवर विद्युतरोषणाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये महापालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रभाग समितीच्या इमारतींचा समावेश आहे. या सर्व सरकारी इमारतींबरोबरच सर्व पादचारी पुलांनादेखील विद्युत रोषणाई करण्यात येणार असून त्यासाठी पालिका १०० कोटींचा खर्च करणार आहे.
पालिकेने सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये ठाणे महापालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रभाग समितीच्या इमारती तसेच शहरातील सर्व पादचारी पुलांचादेखील समावेश करण्यात आला आहे. केवळ दिवाळीनिमित्त नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ही विद्युतरोषणाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण सुशोभीकरण आराखड्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे त्याच ठेकेदारावर पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा काही पडझड झाल्यास ती दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असेल. दरम्यान, दोन भव्य दीपस्तंभ उभारण्याबरोबरच शहरातील मुख्य चौकांचा विकासदेखील करण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या २८ चौकांचा विकास केला जाणार आहे. या सर्व चौकांची रंगरंगोटी करण्यासोबतच प्रत्येक चौकात नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
............
सुशोभीकरण आराखड्यामध्ये ठाण्यातील आनंदनगर चेक नाका तसेच मुलुंड चेकनाका या शहराच्या दोन्ही प्रवेशद्वारावर भव्य दीपस्तंभ उभारण्यात येणार आहे. दीपस्तंभ २५ ते ३० मीटर उंच असणार आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या दीपस्तंभामुळे ठाणे शहरात प्रवेश करताना शहराचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89096 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..