जुन्या साडीचा नवा लूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या साडीचा नवा लूक
जुन्या साडीचा नवा लूक

जुन्या साडीचा नवा लूक

sakal_logo
By

कोमल गायकर, घणसोली
भारतीय संस्कृतीत साडीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्‌या प्रकारच्या साड्यांचे आकर्षण असते. साडी कितीही जुनी झाली तरी ती सांभाळून ठेवली जाते. प्रत्येक साडीशी महिलांच्या आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळेच वापरात नसलेल्‍या अनेक साड्या कपाटात तशाच पडून राहतात. मात्र सध्या जुन्या साड्यांपासून नवनवीन फॅशनेबल ड्रेस शिवण्याचा ट्रेण्ड आला आहे. यात डिझायनर लेहंगापासून कुर्ती, वन पीस, जीन्सवर घालण्यासाठी टॉप, फ्रॉक आदी शिवण्याला विशेष पसंती दिली जात आहे.
सर्वच वयोगटातील महिलांना जुन्या साड्यांपासून क्‍लासिक ड्रेस तयार करणे आवडते. यात अभिनेत्रीही मागे नाहीत. पैठणी, बनारसी साडीचा शिवलेला लेहंगा, डिझायनर आउटफिटला लग्‍न-समारंभांत विशेष पसंती दिली जाते. यात एकतर तुमचा लूक पारंपरिक दिसतो, शिवाय वारंवार त्‍याच त्‍याच साड्‌या नेसून कंटाळा आला असल्‍यान डिझायनर ड्रेसचा पर्याय उपलब्‍ध होतो. साडीपासून अनारकली ड्रेस शिवता येतो. एखादी फ्लोलर प्रिंटची साडी असल्‍यास सुंदर लेहंगा तयार करता येतो.

साडीचा कुर्ता
साडीपासून कुर्ता शिवायचा असेत तर अनेक पॅटर्न उपलब्‍ध आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारातील कुर्ता शिवणार, यावर डिझाईन अवलंबून आहे. अनारकली किंवा फ्लोई ड्रेससाठी तुम्हाला शिफॉन साडी उत्तम आहे. पारंपरिक लूकचा कुर्ता हवा असल्‍यास काठापदराच्या साड्या अथवा खणाच्या साडीचा पर्यायही उत्तम आहे.

आकर्षक ओढणी/दुपट्टा
एखादी काठापदराची सुंदर साडी आहे, जी तुम्‍ही अनेक समारंभात घातली आहे, मात्र आता तोच तोच लूक नको असल्‍यास साडीचा सुंदर दुपट्टा शिवता येतो. एखाद्या प्लेन रंगाच्या, साध्या ड्रेसवर हा डिझायनर दुपट्‌टा अधिक शोभून दिसतो. हा दुपट्टा कायम ट्रेंडमध्ये असल्यामुळे त्याचा वापर वर्षोनुवर्षे वेगवेगळ्या ड्रेसवर करता येतो.

क्रॉप टॉप
महागड्या साडीपासून लेटेस्ट फॅशनचे काही शिवायचे असेल तर तुम्ही छान क्रॉप टॉप आणि लेहंगा शिवू शकता. लग्‍नसमारंभात हे अधिक उठून दिसतात. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सही तयार करता येतात. सॉफ्ट सिल्क, पैठणी, कांजीवरम अशा कोणत्याही साड्यांच्या प्रकारांपासून क्रॉप टॉप आणि लेहंगा शिवता येतो. लहान मुलांचे कपडे तुलनेने महाग असतात. अशा वेळी साडीपासून शिवलेला फ्रॉक, पंजाबी ड्रेस नक्‍कीच वेगळा ठरतो.

लेहंगा, अनारकली
लग्नात लेहंगा चोळी अगदी हमखास घातली जाते. यात हवे तितके वेगवेगळे पॅटर्न मिळू शकतात. घरात जुनी मात्र उठावदार साडी असेल तर तिचा डिझायनर लेहंगा हमखास भाव खाऊ शकतो. साडीचा अनारकली ड्रेसही खूप सुंदर दिसतो. पैठणी, इरकल, पेशवाई अशा कोणत्याही साड्यांपासून तो शिवता येतो.


लहान मुलींसाठी लांब जॅकेट
जॅकेट्‌स अशी गोष्ट आहे जी ड्रेसवर, जीन्सवर इतकेच नव्हे तर फ्रॉकवरही सहज चालू शकते. साडीचा काठ सुंदर असेल तर अशा काठाचा उपयोग जॅकेटला अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी करता येतो. हल्‍ली लांब, पायघोळ जॅकेटचीही चलती आहे. विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींमध्ये त्‍याची विशेष क्रेझ आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89201 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..