
दिवा व ठाण्याला अतिरिक्त पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० द.ल.लि. शुद्ध पाणी प्रतिदिन उपलब्ध करून द्यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आज (ता. १६) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मंजूर केली. यामुळे ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील कोपरी, आनंदनगर, किसननगर, भटवाडी व दिवा परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
वागळे इस्टेट विभाग ११ द.ल.लि. प्रतिदिन, कोपरी आनंदनगर विभाग ६ द.ल.लि. प्रतिदिन, किसननगर २ द.ल.लि. प्रतिदिन, भटवाडी १ द.ल.लि. प्रतिदिन असा एकूण २० एमएलडी अतिरिक्त शुद्ध पाण्याचा पुरवठा व दिवा परिसराला ६.५० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली अतिरिक्त पाण्याची मागणी पूर्ण होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मंजूर झाली असल्याची भावना माजी महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहायक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणेकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89265 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..