
सचिनच्या सुरक्षा रक्षकाची सायबर फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खासगी सुरक्षा रक्षक सायबर गुन्ह्याचा बळी ठरला आहे. कोटक महिंद्रा बँकेचा एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळख सांगणाऱ्या एकाने बनावट फोन करत कर्ज देण्याचे प्रलोभन दाखवून या सुरक्षा रक्षकाची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १३ जुलै रोजी घडली.
सचिनच्या खासगी सुरक्षा रक्षकाला कोटक महिंद्रा बँकेचा एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याची बतावणी करणारा फोन आला होता. या फोनवर त्याला कर्जाची गरज आहे का, याबाबत विचारणा करण्यात आली. सुरक्षा रक्षकाने कर्जाची गरज असल्याचे सांगितल्यावर त्याला दीड लाख रुपयांच्या कर्जाचे प्रलोभतन दाखवून त्याच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्डचे तपशील व्हॉट्सअॅपवर मागवण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदा ८ हजार आणि मग कर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली; परंतु कर्ज न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी १४ जुलै रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89338 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..