
वसईतील ६५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
विरार, ता. १७ (बातमीदार) ः वसई पूर्व वाघराळ पाडा येथील दरड दुर्घटनेनंतर जाग आलेल्या पालिकेने या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ६५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामध्ये तयार होणारी बांधकामे आणि रिकामी घरे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
मागील आठवड्यात बुधवारी वसई पूर्वेला असलेल्या वाघराळ पाडा येथे दरड कोसळून त्याखाली दबलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता; तर दोघे जण जखमी झाले होते. या भागातील सर्वच वस्ती ही अनधिकृत असून डोंगर पोखरून ही वस्ती तयार करण्यात आली आहे. तसेच दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असून त्यावर कारवाईची मागणी अनेकांनी केली होती. मात्र २०१६ च्या पालिकेच्या कारवाईनंतर या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही. अखेर बुधवारी घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर पालिकेने पहिल्याच दिवशीपासून या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारणे सुरू केले आहे. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई होत आहे. या ठिकाणी नव्याने तयार झालेली बांधकामे आणि नागरिक राहत नसलेली बांधकामे प्राथमिक तत्वावर तोडण्यात येत आहेत. आतापर्यंत या ठिकाणची ६५ बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली आहेत. तसेच पुढेदेखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89348 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..