
केडीएमसी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : शहरातील कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मागील तीन महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकवले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शहरात जागोजागी कचरा साचलेला असून, पावसामुळे या कचऱ्याला दुर्गंधी सुटून शहरातील कचराप्रश्न आणखी उग्र बनला आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळत नाही आणि ठेकेदाराला नियमित वेतन देण्याची समज दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.
कल्याण पूर्वेकडील ड आणि जे प्रभागातील कचरा ठेकेदारांच्या माध्यमातून उचलला जातो; मात्र डम्पिंगवर तासन् तास रांगा लावाव्या लागत असल्याने तसेच रस्त्यावरील खड्ड्याचे कारण देत घंटा गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्याने आणि पावसाळ्यात शहरात कचऱ्याची समस्या भीषण बनली आहे. त्यातच सोमवारी सकाळपासून ठेकेदाराच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
...तर कचऱ्याला प्रशासन जबाबदार
ठेकेदाराकडे पगाराची वारंवार मागणी करूनदेखील मागील तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचे कामगारांनी सांगितले. दिवसभर काम करून जर हक्काचा पगार मिळत नसेल, तर घर कसे चालवायचे, असा संतप्त सवाल कामगारांनी या वेळी केला. या आंदोलनकर्त्या कामगारांच्या वतीने माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रशासनाला जाब विचारला असून, ठेकेदाराकडून कायमच कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जात असल्याने प्रशासनाने कामगारांच्या खात्यात थेट पगाराची रक्कम जमा करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने ठेकेदाराला समज न दिल्यास शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्याला प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारादेखील दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89391 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..