
एसीसी सिमेंट कंपनीविरोधात माथाडी कामगारांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : कळंबोली येथील एसीसी सिमेंट कंपनी आणि ठेकादाराविरोधात आंदोलन करण्यासाठी गेलेल्या माथाडी कामगारांच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलनकर्ते माथाडी कामगारांना पांगवण्यासाठी कळंबोली पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या भूमिकेचा माथाडी कामगार वर्गातून निषेध व्यक्त होत आहे.
कळंबोली येथील रेल्वे माल धक्क्यावर टोळी क्रमांक ३१ मधील काम करीत असलेल्या कामगारांच्या जागेवर तुर्भे येथील कामगार काही दिवसांपासून काम करीत आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदाराने याबाबत माथाडी कामगारांना कोणतीही सूचना न देता थेट काम सुरू केल्यामुळे माथाडी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
रेल्वे माथाडी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या हायलँड सोल्युशन्स या ठेकेदाराच्या माध्यमातून टोळी क्र. ३१ मधील हे सर्व कामगार गेल्या सहा वर्षांपासून कळंबोली रेल्वे माल धक्क्यावर काम करीत आहेत, परंतु ठेकेदाराने रेल्वे माथाडी मंडळाला तुर्भे येथील कामगारांना काम करून द्यावे असे पत्र दिले आहे. रेल्वे माथाडी मंडळाने दिलेल्या माहितीनुसार तुर्भे येथील कामगारांनी कळंबोली धक्क्यावर काम करावे असे पत्र ठेकेदाराला दिले नसल्याचे समजले आहे. तरीसुद्धा ठेकेदाराने पोलिसांसोबत जाणूनबुजून तुर्भे येथील कामगारांना कळंबोली रेल्वे धक्क्यावर काम करण्यास सांगितले. मंडळाने असे कोणतेही कायदेशीर आदेश दिले नसल्याचा आरोप आंदोलनकर्ते माथाडी कामगारांचे म्हणणे आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या माथाडी कामगारांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तुर्भे येथील कामगार नोंदीत टोळी ३१ मधील कामगार यांच्यात भांडणे लावून कामगारांची डोकी भडकावून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कट ठेकेदार करत असल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला आहे. जवळपास १५६ माथाडी कामगारांवर ठेकेदार पोलिसांना सोबत घेऊन अन्याय करत आहे. रेल्वे माथाडी मंडळाचे कुठलेही आदेश नसताना अशा पद्धतीने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा सर्व माथाडींनी निषेध केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89473 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..