
आग विझवणारे हाथ अपुरे
बेलापूर, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे पाच हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या; मात्र ५३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या औद्योगिक वसाहतीमधील आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या केवळ ४८ कर्मचाऱ्यांवर आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले असून रासायनिक कंपन्यांची संख्यादेखील मोठी आहे. एमआयडीसीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवावे, यासाठी औद्योगिक वसाहतीकरिता तुर्भे, पावणे आणि रबाळे या ठिकाणी अग्निशमन दलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र केंद्रांची उभारणी करण्यात आल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अपुरे मनुष्यबळ असल्याने निम्म्या कर्मचाऱ्यांकडून गाडा हाकला जात आहे. तिन्ही अग्निशमन केंद्रांमध्ये ९० ते १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; मात्र प्रत्यक्षात ४८ कर्मचारी तैनात आहेत. तसेच तिन्ही ठिकाणी एकूण नऊ वाहने असून त्या ठिकाणीही मनुष्यबळाचाही तुटवडा भासत आहे. प्रत्येक वाहनावर सहा कर्मचारी असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त वाहनचालकांची कमतरता भासत असल्याने कर्मचाऱ्यांना आठ तासांऐवजी १६ तासांची ड्यूटी करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.
काही दिवसांपूर्वी खैरणेतील रसायन कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी चार दिवस लागले होते. त्यानंतरही आग आणखी तीन दिवस धुमसत होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अन्य सात ते आठ अग्निशमन दलांची मदत घेण्याची नामुष्की ओढविली होती. आजही या भागात आगीची घटना घडल्यास बाहेरील अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागत आहे.
अग्निशमन केंद्रातील कर्मचारी
तुर्भे १४
पावणे १७
रबाळे १७
एमआयडीसीच्या एमएमआर क्षेत्रातील अग्निशमन दलातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता महाऑनलाईनमार्फत भरती प्रकिया राबविण्यात आली होती; मात्र काही तांत्रिक आक्षेपानंतर ती रद्द करून आता पुन्हा खासगी संस्थेमार्फत १३० कर्मचाऱ्यांकरिता भरती प्रकिया राबवली आहे. लवकरच त्यांची नियुक्ती करून आवश्यकतेनुसार केंद्रांना कर्मचारी दिले जातील.
- मिलिंद व्ही. ओगले,
सहायक केंद्रप्रमुख, अग्निशमन विभाग,
टीटीसी इन्डस्ट्रीज
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89493 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..