
उपराळे-सातकोर रस्त्याची दुरवस्था
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील उपराळे-सातकोर या आठ ते १२ किमी अंतर असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. किरण गहला यांनी केली आहे.
पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्याची वाईट अवस्था झाली असून येथे दुचाकींचे अपघात होत असतात. दर वर्षी रस्ता दुरुस्तीसाठी ठेकेदार नेमला जातो. मात्र रस्त्याची अवस्था तशीच राहत असल्याने या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील होत आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गहला यांनी दिला आहे.
उपराळे ते दादडे तसेच सातकोर ते डोल्हारी बु.वरून सरळ डहाणू रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे. हा रस्त्याच्या आजुबाजूला असलेल्या सर्व गावांमध्ये मोठी लोकवस्ती असून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना तसेच रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करून या रस्त्याचे वारंवार काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी.
– कॉ. किरण गहला, जिल्हा सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89498 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..