
कल्याण-डोंबिवलीकरांचा आता प्रदूषणमुक्त प्रवास
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : महापालिकेच्या केडीएमटी उपक्रमाला राज्य सरकारने २०७ इलेक्ट्रिक बस मंजूर केल्या आहेत. यामधील पहिल्या टप्प्यातील ५५ बस डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ताफ्यात दाखल होणार असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना प्रदूषणमुक्त प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सरकारच्या पंधराव्या वित्तीय आयोग परिवहन उपक्रमासाठी २०७ बस मंजूर झाल्या असून, त्यासाठी १०० कोटी निधी जाहीर झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात २६ कोटी रुपये केडीएमसीकडे वर्ग झाले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात २६ कोटी रुपये केडीएमसीकडे वर्ग झाले आहेत. २०२० ते २०२६ या आर्थिक वर्षात प्रत्येक वर्षाला केडीएमटीच्या २०७ इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात येणार असून, २०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ५५ बस येणार आहेत.
निविदेला प्रतिसाद
इलेक्ट्रिक बसबाबत निविदा प्रक्रिया केडीएमटी प्रशासनाने सुरू केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला होता; त्यात चार निविदा प्राप्त झाल्या असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे इलेक्ट्रिक बसेसचा मार्ग मोकळा झाला असून, डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात केडीएमटीच्या ताफ्यात ५५ बस येणार असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना प्रदूषणमुक्त बसमधून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
बस कुठे उभ्या करायच्या?
२०७ इलेक्ट्रिक बस केडीएमटीच्या ताफ्यात आल्यानंतर त्या कुठे उभ्या करायच्या, हा प्रश्नच आहे. खंबाळपाडा डेपो केडीएमटीसाठी आरक्षित असताना तेथे पालिकेच्या कचरागाड्या उभ्या राहत असल्याने केडीएमटीचा डेपो प्रश्न ऐरणीवर आला असून, केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे ही समस्या दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------------
प्रशासनाची तारेवरची कसरत
केडीएमटीच्या ताफ्यात सध्या २०० हून अधिक बसेस असल्या, तरी ६० ते ७५ बस रस्त्यावर काढण्यात केडीएमटी प्रशासनाला यश आले असून, वाढते इंधन दर आणि दुरुस्ती खर्च व उत्पन्न यात ताळमेळ ठेवण्यात केडीएमटी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, नवीन इलेक्ट्रिक बस चालवताना त्याची तूट सरकार देणार असल्याने केडीएमटीसह अन्य परिवहन संस्थांना दिलासादायक बाब आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89501 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..