
सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या बेड्या
मानखुर्द, ता. १९ (बातमीदार) ः गोवंडी पोलिसांनी ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला कल्याणच्या अंबिवली गावातून अटक केली. असिफ इराणी (वय- ६२) असे त्याचे नाव असून त्याला पकडण्यासाठी दोन दिवस त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला होता. त्याच्या अटकेमुळे नेहरूनगर, वाकोला, विनोबा भावेनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी २; तर आझाद मैदान पोलिस ठाण्यातील १ अशा ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पथकाला यश आले.
देवनार गाव परिसरातील रहिवासी लक्ष्मी पंजाबी (वय- ७०) यांना भूलथापा देऊन २० ग्रॅम वजनाच्या सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या बांगड्या लंपास करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पंजाबी यांनी गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उपनिरीक्षक अमर चेडे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून याच प्रयत्नात परिसरातील आणखी एका महिलेच्या फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले होते. या वेळी दुचाकी व कपड्यांवरून कल्याणमधील असिफची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते.
५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद
कल्याण येथील अंबिवली गावात राहत असल्याचे स्थानकाजवळच्या उपाहारगृहात येणार असल्याची माहिती मिळाली होती. २ दिवस पोलिसांनी सापळा लावल्यानंतर अखेर तो सापडला. पोलिसांनी त्याला अंबिवली ते टिटवाळा रेल्वेने प्रवास करून नंतर खासगी वाहनाने गोवंडी पोलिस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान मुंबई, नवी मुंबई तसेच मिरा रोड, भायंदर, कल्याणमधील पोलिस ठाण्यांमध्ये जवळपास ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89508 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..