कल्याण-डोंबिवलीतील रस्ते लवकरच खड्डेमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबिवलीतील रस्ते लवकरच खड्डेमुक्त
कल्याण-डोंबिवलीतील रस्ते लवकरच खड्डेमुक्त

कल्याण-डोंबिवलीतील रस्ते लवकरच खड्डेमुक्त

sakal_logo
By

डोंबिवली/कल्‍याण ता. १९ (बातमीदार) : पावसाच्या सुरुवातीला कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर आत्तापर्यंत ४०० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र, पालिका प्रशासनाने आत्तापर्यंत २४७ तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत यातील २७ तक्रारी या इतर विभागाशी संबंधित असून, १५५ तक्रारींचे निवारणदेखील झाले असल्याचा दावा केला. यामुळे आता केवळ ६५ खड्ड्यांच्या तक्रारी उरल्या असल्‍याचे चित्र आहे. परिणामी, पालिकेच्या दाव्यानुसार लवकरच नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पाहायला मिळतील, अशी आशा करण्यास हरकत नाही.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ नागरिकांवर, चालकांवर आली असून, पावसाच्या सुरुवातीलाच शहरात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राजकीय पक्षाची वाट न पाहता सामान्य नागरिकांनी या वर्षीदेखील खड्ड्यांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. नागरिकांचा उद्रेक पाहता पालिका प्रशासनाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खड्ड्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ०२५१-२२०११६८ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला. या क्रमांकावर आतापर्यंत २४७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी इतर विभागाशी निगडीत २७ तक्रारी आहेत. प्राप्त तक्रारींपैकी १५५ तक्रारींचे निवारण महापालिकेने केले असल्याचे जाहीर करण्‍यात आले. यामुळे आता केवळ ६५ तक्रारींचे निवारण करायचे बाकी असून, लवकरच नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जुलै महिन्यात सातत्याने जोरदार पाऊस राहिल्याने रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलैच्या ५५५ मिमी सरासरीच्या प्रमाणात १०१० मिमी पाऊस झालेला असून, यामुळे खड्डे भरण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. याही परिस्थितीत कोल्ड मिक्स, पेव्हर ब्लॉक, खडीकरण व रेडिमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामे पालिका हद्दीत सुरू ठेवण्यात आली आहेत. १० प्रभागांसाठी १३ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून, दररोज जवळपास १५०० ते २००० चौ.मी. क्षेत्रफळातील खड्डे भरण्याचे काम करण्यात येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने या कामास गती देण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. पाऊस उघडल्यानंतर डांबरीकरणाने सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न केले जातील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
----------------------------------
कोट
महापालिका क्षेत्रातील कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत असून, डोंबिवली येथील मानपाडा रोड (स्टार कॉलनी ते मानपाडा जंक्शन), एमआयडीसी डायव्हर्शन रोड (टाटा पॉवर ते बंदिश पॅलेस), पेंढारकर कॉलेज रोड हे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, बदलापूर पाईपलाईन रस्ता व डोंबिवली औद्योगिक क्षेत्र फेज १ व २ हे म.औ.वि.मं.च्या अखत्यारीत असून सदर रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित विभागाची आहे.
- सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता, महापालिका
-----------------------------------------
प्रशासनाकडून धूळफेक
टोल फ्री क्रमांकावर २४७ तक्रारी आत्तापर्यंत प्राप्त झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत ४०० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेकडून पेव्हर ब्लॉक टाकून, खडीकरणानेदेखील खड्डे बुजविण्यात येत आहेत; मात्र हे जास्त दिवस टिकत नसल्याचे चित्र अनेक रस्त्यांवर दिसून येते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89512 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..