गटारीच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन विभाग सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटारीच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन विभाग सज्ज
गटारीच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन विभाग सज्ज

गटारीच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन विभाग सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ ः ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात गटारी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असते. या पार्श्‍वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन विभाग सज्ज झाला आहे. त्यानुसार कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ आदी भागांतील हातभट्ट्यांवर व गावठी दारूच्या अड्ड्यांवर पाच भरारी पथकांमार्फत विशेष करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच विशेष धाडसत्र मोहिमेसह नाकाबंदीदेखील करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पदान विभागाच्या वतीने देण्यात आली.
अवघ्या काही दिवसांवर श्रावण महिना येऊन ठेपला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या दर्श अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर गटारी ठिकठिकाणी साजरी करण्यात येत असते. गटारीच्या निमित्ताने कुटुंबीय, मित्रमंडळी एकत्र येत मासळी, चिकन, मटणावर ताव मारत असतात; तर अनेक जण ओली पार्टीदेखील करत असतात. त्यामुळे या दिवशी ठाणे जिल्ह्यात बेकायदा परराज्यांतील बनावट मद्य विक्रीसाठी बाजारात दाखल होत असते. याची गांभीर्याने दखल घेत ठाणे राज्य उत्पादन विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे.

तीन महिन्यांत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
एप्रिल २०२२ ते जून २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत ठाणे राज्य उत्पदान विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. या कलावधीत ६२४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये ३६८ वारस; तर २५६ बेवारस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३७५ आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यांत वापरण्यात आलेली २२ वाहने यांच्यासह दोन कोटी ३९ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या वतीने देण्यात आली.

दीप अमावास्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील बेकायदा मद्यविक्रीवर करडी नजर ठेवण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्या पथकामार्फत गस्त घालणे. नाकाबंदी करण्यात येत आहे. तसेच स्वस्त व कमी दर्जाचे मद्य प्राशन केल्यास जीवितास हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा मद्याचे सेवन करणे नागरिकांनी टाळावे.
- नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन विभाग, ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89521 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..