खड्डेभरण सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डेभरण सुरू
खड्डेभरण सुरू

खड्डेभरण सुरू

sakal_logo
By

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात तब्बल २३५ ठिकाणी खड्डे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व ठिकाणांचे सर्वेक्षण महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले असून जेट पॅचर आणि कोल्डमिक्स तंत्राद्वारे खड्डे भरण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.
मिरारोड येथील अंतर्गत रस्ते, उत्तन रस्ता, घोडबंदर, हटकेश आदी भागांत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे खड्डे तात्पुरते खडीने भरण्यात आले होते; मात्र पावसाची मोठी सर आल्यानंतर ते पुन्हा उखडले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्यामुळे प्रशासनाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. शहरात तब्बल २३५ ठिकाणी खड्डे पडले आहेत. यातील काही ठिकाणांची आयुक्त दिलीप ढोले यांनी पाहणी केली.

असे भरले जातात खड्डे
पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी जेट पॅचर आणि कोल्ड मिक्स तंत्राचा वापर केला जात आहे. जेट पॅचर या तंत्रात यंत्राच्या साह्याने खड्डे कोरडे केले जातात व उच्च दाबाने खड्ड्यात डांबर भरले जाते; तर कोल्ड मिक्स डांबर हे तयार पिशव्यांमध्ये येते. खड्डे भरण्यासाठी महापालिकेला सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च येण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील काही रस्त्यांवरील खड्डे एप्रिल महिन्यातच डांबराने भरण्यात आले होते; मात्र ते पुन्हा उखडल्यामुळे कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे; मात्र हे खड्डे संबंधित कंत्राटदाराकडून भरण्यात येणार आहेत.

एमएमआरडीएकडूनही काम सुरू
गोल्डन नेस्ट ते काशीमिरा या रस्त्यावर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे खराब होत असलेल्या रस्त्याची डागडुजी एमएमआरडीएकडून केली जाते. या रस्त्याचे डांबरीकरण एमएमआरडीएने मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने केले होते. या कामात रस्ता पाच वर्षे सुस्थितीत राहण्याची हमी असते; मात्र या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि ते एमएमआरडीएकडून भरले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पाहणी
महानगर क्षेत्रात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पहाणी करून ते दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा निर्माण करून संबंधित महापालिकेला मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मिरा-भाईंदरमधील विविध भागांतील खड्ड्यांचीदेखील पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89522 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top