
आंदोलनात सहभागी झाल्याने दोघांचे निलंबन
उरण, ता. १९ (वार्ताहर) : शासकीय नियमांचे उल्लंघन आणि आंदोलनात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संतोष पवार यांना १३ जुलै आणि मधुकर भोईर यांच्यावर ७ जुलै रोजी कारवाई करण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही सामाजिक संस्थेचे आंदोलन, उपोषण अशा सरकारविरोधी कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई आहे. जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असताना मधुकर भोईर यांना ड्युटीवर तैनात करण्यात आले होते. मात्र त्यांनी रात्रीच्या वेळी फोन उचलला नाही. या कारणासाठी निलंबित करण्यात आले, असे सांगण्यात आले. तसेच संतोष पवार हे तालुक्यातील विविध आंदोलनात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या मागणीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, शैक्षणिक कार्यासाठी आणि शेतकरी-कामगार यांच्यावरील अन्यायाविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आले.
सामाजिक संघटनांचा विरोध
संतोष पवार व मधुकर भोईर हे नगरपरिषदेत अनेक वर्षे सेवा देत असल्याने सर्वांना परिचित आहेत. पवार यांनी कोरोना काळात उरण तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून काम केले होते. मात्र तालुक्यातील सामाजिक संघटनांनी निलंबनाच्या कारवाईला विरोध केला आहे. विविध सामाजिक संस्थांनी मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. २२) उरण नगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन केले आहे.
दोन्ही कर्मचाऱ्यांवर आकसापोटी कारवाई केलेली नाही. कारवाईपूर्वी त्यांना तोंडी सूचना, तसेच नोटिसा देण्यात आल्या होत्या; मात्र त्यांनी शासकीय नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
- संतोष माळी,
मुख्याधिकारी, उरण नगर परिषद
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89545 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..