
गोवंडीतील प्रदुषणाची केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना गोवंडीतील बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांटच्या विरोधातील स्थानिकांच्या तक्रारीमुळे तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे असणाऱ्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मे. एसएमएस एनवोक्लिन प्रा. लि.च्या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पामधून होत असलेल्या प्रदूषणाविरोधात स्थानिक संगम वेल्फेअर सोसायटीने सीपीसीबीकडे तक्रार केली होती. या प्रकल्पामधून विषारी वायू नजीकच्या हवेत सोडले जात आहे. या प्रदूषणाचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याचे सोसायटीने केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रदूषणाचा त्रास होऊनच स्थानिकांना कर्करोग, क्षयरोग तसेच आणखी जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची सोसायटीचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सीपीसीबीने दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिकांच्या प्रदूषणाबाबतच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करावी, असे आदेश सीपीसीबीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व्ही. पी. यादव यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणातील कारवाईचा अहवालही सीपीसीबीकडे सादर करावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील अहवाल लवकरच विभागाकडे दिल्याने आम्हा स्थानिकांना दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच या प्रकरणात एसएमएस कंपनीविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा असल्याचेही संगम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89547 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..