
सिक्स पॅक हे अभिनेत्याच्या शरीरावर असण्यापेक्षा चेहऱ्यावर असायला हवेत - अशोक सराफ
ठाणे, ता. १९ (बातमीदार) : अभिनयाची कला ही एखाद्यामध्ये उपजत असावी लागते. अभिनय हा शिक्षण घेऊन येतो, यावर माझा विश्वास नाही; अन्यथा आज अभिनयाचे शिक्षण घेणारे सर्वच जण स्टार झाले असते. एखाद्या पात्राचा अभिनय करत असताना तुम्ही त्यातले किती पैलू शोधता, त्या पात्राला कसे सजवता, हे महत्त्वाचे असून, याकरिता कलाकाराची कल्पनाशक्ती, निरीक्षण कौशल्य, पाठांतर, भाषेवर पकड इत्यादी गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. तसेच सिक्स पॅक हे अभिनेत्याच्या शरीरावर असण्यापेक्षा चेहऱ्यावर असायला हवेत, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.
मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालय, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी १८ जुलै रोजी जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, विनायक गोखले, केदार बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच अशोक सराफ यांच्या चित्रपट, मालिका, नाटक आणि लेखन प्रवासाचा लेखाजोखा ‘बहुरूपी अशोक सराफ’ या मुलाखतीच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला. अभिनेते विघ्नेश जोशी यांनी अशोक सराफ यांना त्यांच्या कारकिर्दीविषयी अनेक प्रश्न विचारून बोलते केले. अभिनय क्षेत्रातील सुरुवात कशी झाली, हे सांगताना सराफ म्हणाले, वयाच्या सातव्या वर्षी एका एकांकिका स्पर्धेत सहभागी झालो असता मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रौप्य पारितोषिक प्रदान करण्यात आले, त्यापासून आपल्याला अभिनय येतो, आपण या क्षेत्रात चांगले काही तरी करू शकतो, असा विश्वास वाटू लागला.
मुलाखतीदरम्यान अशोक सराफ यांनी ठाण्यातील मोह विद्यालयातील डार्लिंग-डार्लिंग नाटकावेळी झालेली फजिती, १० वर्षे स्टेट बँकेमध्ये नोकरी करीत असताना अभिनय क्षेत्रात काम करता यावे, याकरिता दिलेली कारणे आणि त्यामागच्या गंमतीजंमती या उपस्थितांसमोर व्यक्त केल्या.
रंगदेवतेचा वरदहस्त हा प्रत्येक नटाच्या डोक्यावर असायला हवा, हे सांगताना ययाती देवयानी आणि दुबईतील नाटकाच्या दौऱ्यावेळी घडलेला प्रसंग सराफ यांनी सांगितल्यावर उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा राहिला.
----------------------------------
७५ बॅकस्टेज कलाकारांना देणार मदत
अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानिमित्ताने त्यांच्या मनोरंजनसृष्टीतील प्रवासावर आधारित ग्रंथाली प्रकाशनतर्फे बहुरूपी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचावे, याकरिता अशोक सराफ यांच्यासोबत महाराष्ट्रातील १२ शहरात आणि राज्याबाहेरील ८ शहरांमध्ये काही दौरे काढण्यात येणार आहेत. या दौऱ्यांमधील कार्यक्रमांमधून येणाऱ्या काही रकमेमधून ७५ बॅकस्टेज कलाकारांना मदत करण्यात येणार असल्याचे ग्रंथाली प्रकाशनच्या सुदेश हिंगलासपूरकर यांनी ठाण्यातील कार्यक्रमात जाहीर केले. या पुस्तकाच्या निमित्ताने पहिला दौरा हा सोमवारी ठाण्यात पार पडला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89572 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..