चेणा नदीवर रिव्हरफ्रंट डेव्‍हलपमेंट प्रकल्प साकारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेणा नदीवर रिव्हरफ्रंट डेव्‍हलपमेंट प्रकल्प साकारणार
चेणा नदीवर रिव्हरफ्रंट डेव्‍हलपमेंट प्रकल्प साकारणार

चेणा नदीवर रिव्हरफ्रंट डेव्‍हलपमेंट प्रकल्प साकारणार

sakal_logo
By

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मिरा-भाईंदरच्या हद्दीत असलेल्या चेणा नदीवर रिव्हरफ्रंट डेव्‍हलपमेंट प्रकल्प साकार होणार आहे. गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंट डेव्‍हलपमेंट प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प असणार आहे आणि राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.

महापालिका हद्दीतील चेणा गावात असलेली ही नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत आहे. पावसाळ्यात उद्यानातील डोंगरातून आलेले पाणी मोठ्या प्रमाणात नदीत येत असते. त्यामुळे अनेक जण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नदी परिसरात येत असतात. नदीच्या या पाण्याचा वापर करण्यासाठी नदीवर बांध बांधण्यास सरकारने याआधीच परवानगी दिली आहे. आता हा नदी परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी नदीवर साबरमतीच्या धर्तीवर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली आहे व पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत.

प्रकल्पांतर्गत नदीच्या किनाऱ्याचा पूर्णपणे विकास केला जाणार आहे. त्यात फ्लॉवर पार्क, हिरवळ, गार्डनिंग, बसण्याची सोय, फिरण्यासाठी पाथ वे अशा पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधांचा समावेश असणार आहे. नदी किनाऱ्यावर पर्यटकांना फिरण्याची व बसण्याची सोय असेल आणि नदीकिनारी पायऱ्या बनवल्या जातील. आकर्षक दिव्यांची रोषणाई, पर्यावरणाचा विचार करून उद्यान आदी पर्यटकांसाठीची आकर्षणे असतील. या प्रकल्पाला ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यातील पाच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट केल्यास नदीतील पाणी शुद्ध राहते, परिसर स्वच्छ राहतो आणि पर्यावरणाची काळजीही घेतली जाते. चेणा नदी हे ठाणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी रिव्हर फ्रंट विकसित झाल्यास ठाणे, मुंबईच्या लोकांना त्या ठिकाणी १५ मिनिटांत पोहचणे शक्य होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक आदिवासी, आगरी व इतर भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89636 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..