
भिवंडीतील वऱ्हाळादेवी तलाव तुडुंब
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारा वऱ्हाळादेवी तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात असले, तरी लाखो लिटर पाणी नाले-गटारात वाहून जात असल्याने सर्वसामान्य नागरिक व नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त प्रशासनाने तलावाची खोली वाढवून उंच भिंत उभारून पाण्याची साठवणूक केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल यासाठी आयुक्तांनी तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे उपमहापौर मनोज काटेकर, ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांनी केली आहे. वऱ्हाळादेवी तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जुन्या भिवंडीतील सुमारे एक लाख रहिवासी नागरिकांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
भिवंडी शहरातील कामतघर परिसरात नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त वऱ्हाळादेवी तलाव असून, तो पाण्याने तुडुंब भरून धो धो वाहू लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचून नुकसान झाले आहे. असे असले तरी वऱ्हाळादेवी तलाव तुडुंब भरल्याने आता लाखो रहिवाशांना भेडसावणारा पाणीकपातीचा प्रश्न सुटणार आहे. वऱ्हाळादेवी तलावातून जुनी भिवंडी शहराला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज दोन एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89639 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..