खाडीपार पूल बनला वाहनतळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाडीपार पूल बनला वाहनतळ
खाडीपार पूल बनला वाहनतळ

खाडीपार पूल बनला वाहनतळ

sakal_logo
By

भिवंडी, ता. २० (बातमीदार) ः भिवंडी महापालिका क्षेत्रात पार्किंग झोन नसल्यामुळे अनेक वाहनचालक मनमानी करून कुठेही आपली वाहने उभी करीत असतात. त्यामुळे भिवंडी शहर परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. भिवंडी तालुक्यात कामवारी नदीवर नव्याने बनवण्यात आलेल्या खाडीपार पुलावर मोठ्या प्रमाणात बेकायदा अवजड मालवाहू ट्रक, टेम्पोसह अन्य वाहने उभी करून ठेवली जात असल्याने हा पूल जणूकाही वाहनतळ बनून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. भिवंडी पोलिस उपायुक्त व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रहदारीच्या मार्गावर बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून खाडीपार काटई व कांबे मार्गे पारोळा रस्ता असून तो वसई-गुजरात या महामार्गाला जोडत आहे. या रस्त्यावर कामवारी नदी वाहत असून कांबे गावाकडे जाण्यासाठी पुरातन अरुंद पूल आहे. तो बराच खाली असल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने त्या ठिकाणी नव्याने मोठा अधिक उंचीचा पूल एमएमआरडीएच्या माध्यमातून नुकताच उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता या मार्गावर सुरळीतपणे वाहतूक व्यवस्था सुरू झाली आहे. असे असताना गेल्या महिनाभरापासून पुलावर एक नवीनच समस्या उभी राहिली आहे. या पुलावरील दोन्ही मार्गिकांवर वाहनचालक रात्री व दिवसा अवजड मालवाहू ट्रक, टेम्पो, रिक्षा उभ्या करून रस्ता व्यापून ठेवत आहेत. त्यामुळे या पुलावर मार्ग अरुंद झाला असून येथून वाहन मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दोन्ही बाजूला वाहने उभी राहत असल्याने वाहनकोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक वाहतूक पोलिस यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अजूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89658 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top