लसीकरणात मुंबईचा ३६चा आकडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणात मुंबईचा ३६चा आकडा!
लसीकरणात मुंबईचा ३६चा आकडा!

लसीकरणात मुंबईचा ३६चा आकडा!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई जिल्हा लहान मुलांच्या लसीकरणात पिछाडीवर आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लशीचा पहिला डोस देण्यात मुंबई ३६ व्या स्थानावर आहे; तर १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात मुंबई शहर ३० व्या स्थानावर आहे. तुलनेत इतर जिल्ह्यात लहान मुलांमधील लस घेण्याची टक्केवारी समाधानकारक असल्याचे राज्य आरोग्य विभाग अधिकाऱ्याने सांगितले; मात्र लसीकरणाचा अमृतमहोत्सव मोहिमेतून लस लाभार्थी वाढवण्यास मोठी मदत होणार असल्याची आशादेखील व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत १२ ते १४ वयोगटातील केवळ ३९.२८ टक्के मुलांना कोविड लशीचा पहिला डोस देण्यात आला; तर १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५८.५९ टक्के मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १४ जुलैपर्यंत १२ ते १४ वयोगटातील सरासरी ६४.११ टक्के मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे; तर १५ ते १७ वर्षे वयोगटातील ६५.९१ टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे. याचाच अर्थ केवळ ४७.६३ टक्के मुलांनी पूर्णपणे लसीकरण केले आहे.
राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनीदेखील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कमी लसीकरण होत असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. राज्यातील इतर जिल्ह्यांत मुलांना लस देण्याचे काम चांगल्या रीतीने सुरू आहे; मात्र मुंबईत पहिल्या डोसपासूनच लहान मुलांना लस देण्यास पालक निरुत्साही दिसून आले. त्यामुळे सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मुलांच्या लसीकरण मोहिमेबद्दल अधिक जागरुकता निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत. यातून लस घेणाऱ्या मुलांची संख्या वाढेल अशी आशा देसाई यांनी व्यक्त केली.

लसीकरणावर अफवांचा परिणाम
मुलांमधील लसीकरण सुरुवातीपासून कमी होत आहे. यात पालकांकडून अनेक कारणे देऊन मुलांना लस देणे टाळण्यात आले. लशीवरील अविश्वास, रुग्ण घटत असल्याने लस नको, शाळा, परीक्षा, अशी अनेक कारणे देण्यात आली. त्यामुळे पालकांना मुलांच्या लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. समाज माध्यमावर पसरणाऱ्या अफवांमुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम झाल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

आरोग्य विभाग सतर्क
सर्व वयोगटांतील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सध्या कंबर कसली असून हर घर दस्तक मोहिमेतून आरोग्य सेविका, आशा वर्कर्स आणि आरोग्य अधिकारी दुसरा तसेच बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यात ७५ दिवसांमधील मोफत लसीकरणाच्या अमृत महोत्सव मोहिमेमुळे लसीकरणाचे काम सोपे जाईल, असे आरोग्य अधिकारी सांगत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89683 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..