
१७ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : कोपरखैरणे व घणसोली भागातील दोन घरांवर छापे टाकत तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. कोपरखैरणे येथील कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करणाऱ्या व्यक्तीला अटक; तर घणसोलीतील कारवाईतील आरोपीचा शोध सुरू आहे.
कोपरखैरणे भागात पानटपरी चालवणाऱ्या मनोजकुमार नरेंद्र खंडा (वय ३७) याने भाड्याने घर घेऊन त्यात गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे कोपरखैरणे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सागर धुमाळ व त्यांच्या पथकाच्या मदतीने मंगळवारी सायंकाळी कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील सगुणी निवास इमारतीत तळमजल्यावरील घरावर छापा मारला. यावेळी सदर घरामध्ये अनेक गोण्यांमध्ये एकूण नऊ लाख ५५ हजार रुपये किमतीचा साठा आढळून आला. पोलिसांनी मनोजकुमार खंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करून सदर गुटख्याचा साठा जप्त केला.
रबाळे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोडरे व त्यांच्या पथकाच्या मदतीने घणसोली गावात हनुमान मंदिरालगतच्या घरावर छापा मारला. या घरामध्ये पोलिसांना पावणेआठ लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. रबाळे पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त करून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89696 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..