
मुंबईत रेल्वे गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : कोरोनानंतर रेल्वे पोलिसात नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीत ६३१३ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१९च्या पहिल्या सहा महिन्यांत हाच आकडा १६ हजार ९४८ इतका होता. त्यामुळे २०१९ या वर्षाशी तुलना करता हे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रवासावर बंधने आली होती. अशा परिस्थितीत कोविडपूर्व काळाच्या (२०१९) तुलनेत या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात रेल्वे पोलिसांमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांचा आलेख खाली आला आहे. त्याचवेळी २०१९ मध्ये चोरीच्या १५९७७ घटनांची नोंद झाली आहे. तर २०२२च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हा आकडा ५७०८ इतका आहे. दरोड्याच्या घटनाही निम्म्या झाल्या आहेत. २०१९ मध्ये ६६२ दरोड्याचे गुन्हे दाखल झाले होते. २०२२ मध्ये जूनपर्यंत ही संख्या ३४७ वर आली आहे. गुन्ह्यांचे प्रमाणच नाही, तर रेल्वेच्या परिसरात प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील २०१९ च्या याच कालावधीच्या तुलनेत कमी झाल्याचे समोर आले आहे. २०१९ मध्ये १३२२ व्यक्तींचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाला होता २०२२ मध्ये ११९६ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
रेल्वे जीआरपीच्या वतीने रेल्वे परिसरात गुन्हे रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वेआवारातील बेकायदेशीर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर नियंत्रण ठेवणे, रेल्वेलगत भिंती गुन्हेगार आणि घुसखोरांचा प्रवेश बंद करण्यासाठी उपाययोजना करणे, २४ तास ७ दिवस अखंड सीसी टीव्हीच्या मदतीने पाळत ठेवणे. २०२०-२१ मध्ये त्यांनी अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळवले, परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असा जीआरपी अधिकाऱ्याचा दावा आहे.
सततची जनजागृती मोहीम, गुन्ह्यांची नोंद, सॉफ्टवेअर-आधारित तंत्रज्ञानाचा समावेश करून सुरक्षिततेचा आढावा, सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्याच्या प्रणालीत सुधारणा, गुन्हे डेटाबेसचे आधुनिकीकरण यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. राज्याच्या हद्दीबाहेरील गुन्हेगारांचा पाठपुरावा करणे, विविध उपाययोजनाचा सातत्याने आढावा घेणे आदी गोष्टी रेल्वेच्या आवारातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कामी येतात.
- कैसर खालिद, पोलिस आयुक्त (जीआरपी), मुंबई
रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईंमुळे रेल्वे परिसरात गुन्हे रोखण्यात मदत झाली आहे. ही चांगली बातमी आहे आणि हीच पद्धत संपूर्ण राज्याच्या पोलिसांनाही लागू केली जावी.
- समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ते
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89697 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..