
मेट्रोच्या कामावरून राजकीय वातावरण तापणार
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रोच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. मात्र, हे काम साडेतीन वर्षे बंद असून आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच या मार्गाला चालना देण्यासाठी शिंदे गटाचे रवि पाटील तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रव्यवहार करत कामाला चालना द्यावी अशी मागणी केली आहे. आगामी काळात या मुद्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
कल्याण-भिवंडी-ठाणे या मेट्रो कामाचा शुभारंभ होऊन साडेतीन वर्षे उलटली. मात्र, राज्यात महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यावर स्थगिती आणत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने कल्याण-डोंबिवली-ठाणे-भिवंडी परिसरातील नागरिक मेट्रोपासून वंचित राहिले असल्याचा आरोप नरेंद्र पवार यांनी केला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना मुंबईत प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मेट्रोला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मात्र या प्रकल्पाकडे आघाडी सरकारने लक्ष दिले नाही. राज्यात महाआघाडी सरकार आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली त्यामध्ये अशा प्रकल्पांचाही समावेश होता. आता राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिंदे सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक उपशहर प्रमुख रवि पाटील यांनी ही याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89744 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..