जुलै महिन्यातील पावसाने पशुपक्षांनाही झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुलै महिन्यातील पावसाने पशुपक्षांनाही झोडपले
जुलै महिन्यातील पावसाने पशुपक्षांनाही झोडपले

जुलै महिन्यातील पावसाने पशुपक्षांनाही झोडपले

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : जुलै महिन्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात पडलेला धुवांधार पाऊस, वादळी वारा इत्यादींचा फटका माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांनादेखील बसला आहे. पावसामुळे झाडावरील घरटी कोसळणे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पक्ष्यांच्या पंखांना जखमा होणे, गारठ्याने प्रतिकारशक्ती कमी होणे, अशा कारणांमुळे पशुपक्ष्यांना हकनाक जीव गमवावा लागतो. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत १ ते २० जुलैदरम्यान तब्बल १५४ पशुपक्षी जखमी झालेले असून, रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर या संस्थेकडून जखमी पशुपक्ष्यांचे बचावकार्य करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
जखमी पशुपक्ष्यांमध्ये पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी इत्यादींचा समावेश आहे. ठाण्यातील खाडी किनारी, तसेच येऊर येथील उपवन, वर्तकनगर परिसरात ५० जखमी पशुपक्षी आढळले असून, मुंबई उपनगर शहरांमध्ये ९१; तर नवी मुंबईत १२ जखमी पशुपक्षी रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर या संस्थेला सापडले आहेत. जखमी झालेल्या प्राण्यांमध्ये कोल्हा, मुंगुस, माकड, घार; तर पक्ष्यांमध्ये पोपट, पतंग पक्षी, कोकिळा, मैना, जलचर पक्षी, कावळा, कबूतर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कासव, साप इत्यादींचा समावेश आहे. जखमी पशुपक्ष्यांपैकी १७ पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पशूंमध्ये विक्रोळी भागात मृतावस्थेत पडलेल्या कोल्ह्याचाही समावेश आहे. जोरदार पावसात भरतीच्या वेळी कोल्ह्यांचे वास्तव्य असणारे खारपुटी वन पाण्याखाली गेल्याने कोल्हा हा वनातून बाहेर पडला असून काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. कोल्ह्यासह एक माकड, एक मुंगुस, घार, पोपट, कासव इत्यादींचा समावेश असल्याची माहिती रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
मुसळधार पाऊस असताना पाण्याच्या आणि वाऱ्याच्या जोरामुळे पक्ष्यांना याचा सर्वाधिक फटका बसून पक्षी घरट्यातून खाली कोसळतात, पक्ष्यांच्या पंखांना जखमा होऊन त्यांचे पंख नष्‍ट होतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकदा त्यांना याचा फटका बसतो; तर पावसात भिजल्यामुळे गारठूनदेखील अनेक प्राणी आजारी पडतात.
बचावकार्यासाठी आवाहन
कोणत्‍याही नागरिकाला जखमी अवस्थेतील पशुपक्षी आढळल्‍यास त्यांच्या बचावकार्यासाठी आणि पुढील उपचारांसाठी रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर संस्थेच्या ७६६६६८०२०२, ९८६९७८०२०२ किंवा वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पवन शर्मा (रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर) यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89745 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..