
रुग्णांना ताटकळत ठेवणे बंद करा
रुग्णांना ताटकळत ठेवणे बंद करा
आयुक्त अभिजित बांगर यांची वाशी रुग्णालयाला सूचना
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ ः महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना ताटकळत न ठेवता तत्काळ सुविधा देण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिल्या. बांगर यांनी अचानक वाशी रुग्णालयाला भेट दिली. भेटीत त्यांना रुग्णालयातील केस पेपर काढण्यासाठी लागलेली गर्दी पाहून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नोंदणी, तपासणी, आवश्यकतेनुसार एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन अशा चाचण्या करणे तसेच औषधे घेणे या प्रक्रियेसाठी कमीत कमी प्रतिक्षा कालावधी असावा व नागरिकांचा वेळ वाचावा यादृष्टीने आवश्यक बदल करावेत असे निर्देश बांगर यांनी दिले.
वाशी रुग्णालयातील भेटीप्रसंगी बांगर यांनी केस पेपर नोंदणी कक्षांसह इतर सर्व सुविधांची बारकाईने पाहणी केली. केस पेपर नोंदणी करताना ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच दिव्यांग व गरोदर महिला यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणेबाबत नियोजन करण्याच्या सूचना याप्रसंगी दिल्या. रुग्णालयात सद्यःस्थितीत खासगी संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने ठरवून दिलेल्या दरात सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. नुकतीच नवी मुंबई महापालिकेतर्फे सिटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध करून घेण्यात आली आहे. सध्या याप्रकारे सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली जात असून या नव्याने सुरू व्यवस्थेची आयुक्तांनी पाहणी केली.
पालिकेच्या सुविधेत सीटी ‘स्कॅन कॉन्ट्रॅक्ट’ ही चाचणी लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने साधनसामुग्री घेऊन नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गतिमान कार्यवाही करावी असे निर्देश बांगर यांनी दिले. महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सिटी स्कॅन सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांना व्हावा याकरिता पूर्ण क्षमतेने यंत्रणेचा वापर करावा असेही बांगर यांनी सांगितले. खासगी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सुविधेपेक्षा नागरिकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारी पालिकेमार्फत चालविण्यात येणारी सिटी स्कॅन सुविधा अधिक सक्षम करावी असेही बांगर यांनी स्पष्ट केले. अशाच प्रकारे एक्सरे कक्ष, सोनोग्राफी कक्ष, ईसीजी कक्ष अशा सर्व चाचण्यांच्या कक्षांची पाहणी केली. रोज किती चाचण्या होतात याचा आढावा घेत नागरिकांना चाचण्यांसाठी किती वेळ वाट पहावी लागते याचाही तपशील बांगर यांनी जाणून घेतला.
सोनोग्राफी कक्षाबाहेर गरोदर महिलांना जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे औषध वितरण कक्षाला भेट देत आयुक्तांनी औषध वितरण प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. औषधे घेण्यासाठी नागरिकांना फार वेळ रांग लावावी लागू नये यादृष्टीने दैनंदिन आढावा घेऊन आवश्यकतेनुसार औषध वितरण खिडक्यांमध्ये वाढ करण्याचेही बांगर यांनी सूचित केले.
मध्यवर्ती असल्याने वाशी रुग्णालयावर भार
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी रुग्णालय मध्यवर्ती व सर्वांना सोयीचे असल्याने या रुग्णालयावर रुग्णसेवेचा सर्वाधिक भार असतो. त्यामुळे येथील कार्यप्रणालीचे सुव्यवस्थित नियोजन करा. रुग्णांचा कमीत कमी वेळ सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेत जावा या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. पालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध चाचण्यांच्या सुविधाही अधिक गुणवत्तापूर्ण रितीने व सुलभरीतीने दिल्या जाव्यात याबाबतही रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांना निर्देश दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89757 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..