पालिका शोधणार सूप्त क्षयरोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका शोधणार सूप्त क्षयरोगी
पालिका शोधणार सूप्त क्षयरोगी

पालिका शोधणार सूप्त क्षयरोगी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिका आता सूप्त क्षयरोगी शोधणार आहे. या मोहिमेअंतर्गत क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीची आयजीआरए चाचणी केली जाणार आहे. आय.जी.आर.ए म्हणजे इंटरफेरॉन गामा रेडिओइम्युन ॲसे ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. क्षयरोग प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
ज्यांच्या थुंकीमध्ये क्षयरोगाचे जंतू आढळून आले आहेत, अशा क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील, निकटच्या सहवासातील व्यक्तींची व कुटुंबीयांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी प्रामुख्याने त्या घरातील इतर कुटुंबीयांना क्षयरोग आजार असल्याबाबतदेखील निदान व्हावे, या दृष्टीने करण्यात येणार आहे. या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तीला क्षयरोगाची लक्षणे नसतानादेखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्यासाठी आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते.
...
दोन वर्षे पाठपुरावा
आय.जी.आर.ए. वैद्यकीय चाचणीचा अहवाल हा ‘सूप्त - क्षयरोग’ यासाठी बाधित नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीला क्षयरोगाचे संक्रमण नसल्याची खातरजमा होते. दरम्यान अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून क्षयरोग बाधेबाबत त्या व्यक्तीची पुढील दोन वर्षांपर्यंत नियमितपणे पाठपुरावा तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकारची पाठपुरावा तपासणी प्रत्येक सहा महिन्यांतून एकदा करण्यात येईल. जर एखाद्याचा अहवाल बाधित आढळल्यास त्या व्यक्तीला ‘क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार’ हे आठवड्यातून एकदा व एकूण १२ आठवडे दिले जातील. तसेच क्षयरोग बाधेच्या अनुषंगाने पुढील दोन वर्षे त्या व्यक्तीचा नियमितपणे पाठपुरावा केला जाईल.
...
प्रयोगशाळेसह करार
डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, या चाचणी करण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेसह पालिकेने करार केला आहे. या कराराअंतर्गत या उपक्रमाच्या सर्व बाबी संबंधित प्रयोगशाळेद्वारे करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुदृढ व्यक्तींची यादी घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्या घरी जाऊन रक्ताचे नमुने घेणे, चाचणी करणे व चाचणीचा अहवाल जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याला देणे या सर्व बाबी समाविष्ट असणार आहेत.
...
उपचार निशुल्क
प्रयोगशाळेला पात्र सदस्यांची यादी देण्यात आल्यावर त्यांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्या यादीतील व्यक्तींच्या सोयीनुसार वेळ घेऊन घरी भेट देतील. त्यांनतर वैद्यकीय चाचणीसाठी रक्ताचे नमुने गोळा करून चाचणी झाल्यावर चाचणीचा अहवाल जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याला देण्यात येईल. या अहवालातून क्षयरोग बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचाराची औषधे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालयांमधून निशुल्क देण्यात येतील.
...
महत्त्वाचा प्रकल्प
सूप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सूप्तावस्थेत असतात. तसेच अशी बाधा झालेल्या व्यक्तींमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात. दरम्यान सूप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तींमध्ये भविष्यात ‘सक्रिय क्षयरोग’ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळेच सूप्त क्षयरोगाचे मापन व विश्लेषण करणारा हा प्रकल्प मुंबईच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89767 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..