
घुसखोरांविरोधात मध्य रेल्वेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मध्य रेल्वेने माझगाव येथील रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या घुसखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तात घुसखोरांच्या खोल्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. ‘सकाळ’ने गेल्या आठवड्यात याबाबत आवाज उठवताच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे, परंतु बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या भ्रष्ट रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
माझगाव येथील गन पावडर रोडवर मध्य रेल्वेची ‘सेंट्रल रेल्वे कॉलनी’ आहे. कॉलनीतील धोकादायक इमारतींकडे काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नजर गेली आणि तेथील खोल्या भाड्याने देण्यास सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांपासून येथील खोल्या दरमहा १० हजार रुपये भाड्याने दिल्या जात असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. वृत्ताची दखल घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी कॉलनीत बेकायदा राहणाऱ्या परप्रांतीयांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर मध्य रेल्वेने ५० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा घेऊन गुरुवार-शुक्रवारी कॉलनीतील घुसखोरांवर कारवाई केली.
काही रेल्वे कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सील केलेल्या खोल्या परप्रांतीय, बांगलादेशी घुसखोरांना भाड्याने दिल्या होत्या. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. आता खोल्यांवरील कारवाईनंतर रेल्वेने घुसखोरांना आश्रय देणाऱ्या भ्रष्टाचारी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- अभिषेक खरात, अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी, भायखळा विधानसभा
रेल्वे कॉलनीतील घुसखोरांविरोधात कारवाई झाली; मात्र परप्रांतीय घुसखोरांना आश्रय देणाऱ्या संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केव्हा कारवाई होईल, हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला अपेक्षा आहे, की रेल्वे प्रशासन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करेल.
- विठ्ठल लवांडे, निवृत्त रेल्वे कर्मचारी, मध्य रेल्वे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89852 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..