
वरळीच्या अभ्यासगल्लीला नवी झळाळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ :अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण म्हणजे वरळीची अभ्यास गल्ली. वृक्षाच्छादित आणि कमी वर्दळीच्या या अभ्यास गल्लीला नवी झळाळी मिळाली आहे. सोबत विद्यार्थ्यांसाठी नव्या सुविधाही पालिका प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत. आता ही गल्ली पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक झाली आहे.
मुंबई महापालिकेने ४०-मीटर लांबीच्या वरळीच्या पोद्दार रुग्णालयाच्या मागे असलेल्या शांत पथावर सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. अभ्यास गल्लीत विशेष आसन व्यवस्था, छत, आधुनिक फर्निचर, चांगले दिवे, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे स्वच्छतागृहांसह खुले वाचनालयही उभारण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अभ्यास गल्लीमध्ये डिजिटल प्रोजेक्शनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूच्या भिंतींवर भित्तीचित्रे रंगवण्याबरोबरच, विद्यार्थ्यांना ई-पुस्तकांचा माहिती घेण्यासाठी आणि ऑनलाइन मार्गदर्शन मिळविण्यास मदतीसाठी क्यूआर कोड देखील पालिकेने लावले आहेत. महापालिकेने या प्रकल्पावर ७० लाख रुपये खर्च केले असून, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांसाठी हक्काची जागा
वरळीतील पोद्दार हॉस्पिटलच्या मागे असलेली अभ्यास गल्ली या भागातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पसंतीची जागा आहे. इथे रहदारी जास्त नसते. त्यामुळे अभ्यास करता येतो. येथे अभ्यास करण्यासाठी येणारे बहुतेक विद्यार्थी हे गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असतात. छोट्याश्या घरात अभ्यास होणे शक्य नसल्यामुळे त्यांना शांततेत अभ्यासासाठी एका जागेची आवश्यकता असते. या गल्लीच्या सुशोभीकरणाच्या कामामुळे विद्यार्थ्यांसोबतच इथले रहिवासी सुद्धा आनंदात आहेत.
----------
वास्तूचा वारसा पुनर्संचित करणे हा बीएमसीचा प्राथमिक उद्देश आहे. ही गल्ली या शहराच्या प्रतिष्ठित खाणाखुणांपैकी एक आहे. अनेक दशकांपासून, अनेक विद्यार्थ्यांनी इथे अभ्यास केला. इथून अभ्यास करून कित्येक जण आयएएस अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर बनले. हा परिसर ज्या वातावरणासाठी ओळखला जातो ते अधोरेखित करणे ही प्रकल्पामागची मूळ संकल्पना आहे.
- शरद उघाडे, सहाय्यक आयुक्त, मुंबई मनपा.
------------
मी या गल्लीत पूर्वीपासून अभ्यासासाठी येत आहे. येथे बसण्यासाठी नीट जागा उपलब्ध नव्हती. दिवे कधीकधी बंद व्हायचे, त्यामुळे अभ्यास करणे कठीण जात असे. आता हा परिसर अधिक सुधारला आहे.
-रश्मी गुरव, विद्यार्थिनी
-----------
पालिकेने अभ्यास गल्लीचे नूतनीकरण केले हे चांगले आहे. परंतु, याची नियमित देखभाल करणे देखील महत्त्वाचे आहे. शांततेमुळे येथे काही समाजकंटक सुद्धा येतात त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
- सुनील शेलार, स्थानिक रहिवासी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89927 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..