दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त रस्ते! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त रस्ते!
दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त रस्ते!

दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त रस्ते!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २३ ः मुंबई महानगरात रस्ते बांधणीच्या कामांचा मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.२३) आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला. तब्बल ४ हजार ९०० कोटी रूपयांचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी अधिकारी उपस्थित होते. 

मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो. यंदा सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. तर उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पुढच्या वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पुरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश करण्यात आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
-------
४ हजार ९०० कोटींचा खर्च
मुंबईत यंदा ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटिकरणाची जी कामे प्रस्तावित आहेत, त्यामध्ये - शहर विभागात ५० किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटिकरणासाठी ८०० कोटी, पूर्व उपनगरात ७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ६०० कोटी तर पश्चिम उपनगरात २७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ३ हजार ५०० कोटी असा एकूण ४ हजार ९०० कोटींचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये १३.४० मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण पॅसेजमध्ये (२०० मिलिमीटर जाड काँक्रिट थराचा रस्ता) करण्यात येतील. तर १३.४० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची सुधारणा (२८० मिलिमीटर जाड काँक्रिट थर) सिमेंट काँक्रिटीकरणमध्ये करण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90019 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top