
माथेरानमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी
माथेरान, ता. २४ (बातमीदार) ः पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून माथेरानची ओळख सातासमुद्रापार आहे. देश-विदेशातले पर्यटक माथेरानला आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात तर पर्यटकांची पावले माथेरानकडे हमखास वळतात. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गतहारी अमावस्येअगोदरच पर्यटकांनी माथेरान फुलले आहे. जोरदार पावसातसुद्धा पर्यटकांचा ओघ कायम होता.
रायगड जिल्ह्यातील गिरीशिखरावरील एकमेव पर्यटनस्थळ म्हणून माथेरानचा नावलौकिक आहे. शारलोट तलावाचा सुरक्षित असलेला धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्यामुळे पावसाळ्यात लोक या धबधब्याखाली मौजमजा करायला येतात. जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची तुफान गर्दी येथे पाहावयास मिळाली. टॅक्सी स्टँड असो, बाजारपेठ असो सर्वत्र पर्यटकांची रेलचेल दिसत होती. जोरदार पावसात भिजण्याचा आनंद त्यात गरम भजी, चहा आणि मक्याच्या कणसावर ताव मारताना पर्यटक दिसत होते.
शनिवारी सकाळपासूनच पर्यटक माथेरानमध्ये दाखल होऊ लागले. पावसात भिजत पायी चालत मनसोक्त फिरत हॉटेलमध्येसुद्धा मनसोक्त पावसाळी मजा घेत होते. संध्याकाळपर्यंत सर्व हॉटेल आणि लॉज फुल्ल झाले होते. काही पर्यटकांना राहण्यासाठी खोली न मिळाल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. पर्यटकामध्ये तरुणाईचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. रात्री ९ वाजता प्रत्येक हॉटेलमध्ये मनसोक्त मजा करताना पर्यटक दिसत होते. नैसर्गिक रेनडान्स, गाण्याच्या भेंड्या सर्वत्र तरुणाईचा जल्लोष होता. यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. शनिवारी पूर्ण दिवस आणि रविवार दुपारी २ वाजेपर्यंत एकूण १४ हजार ४७५ पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले, अशी माहिती कॅपिटेशन कर वसुली विभागाकडून देण्यात आली.
---
पर्यटकांची संख्या
शनिवार- प्रौढ- ८८४० मुले- ४३३
रविवार दुपारपर्यंत- प्रौढ- ४८६० मुले- ३४२
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90078 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..