
कोपरखैरणेत डासांचा उपद्रव
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे नोड व अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील गावांमध्ये सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे आजार पसरण्याची भीती असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने कोपरखैरणे विभागात धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छ शहराची बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहरात सध्या डासांचा उपद्रव वाढला आहे. कोपरखैरणे नोड व गावठाण भागात या समस्येने अधिकच उग्र स्वरूप घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक स्वच्छता, औषध फवारणी यांसारख्या कामांवर वर्षाला कोट्यवधींचा खर्च होत असताना शहरात त्या तुलनेने काम होत नसल्याची नागरिकांमधून ओरड आहे. शहरात स्वच्छतेचे काम ठेकेदारामार्फत केली जात आहेत; पण त्यांच्या कामावर कोणाचाही अंकुश नसल्याने दिखाव्यापुरते कामे केली जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, नागरिकांना डासांच्या उपद्रवाला तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छता किंवा फवारणीचे काम झाल्यानंतर त्याची पाहणी स्वछता निरीक्षकांकडून होत नसल्याने प्रत्येक प्रभागात धूर फवारणी तसेच गटारात औषधे टाकण्याची मागणी होत आहे.
--------------------------
पावसाळ्यात अनेक ठिकाणी कचरा साचल्याने सध्या डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पालिकेने स्वच्छतेसोबतच औषध फवारणी करण्याची गरज आहे.
- संदीप पाटील, अध्यक्ष, आगरी कोळी युथ फाऊंडेशन
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90194 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..