
भिवंडीत खड्ड्यामुळे एका युवकाचा मृत्यू
भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी राजनोली चौक परिसरातून कल्याणच्या दिशेने जाणारे दोन दुचाकीस्वार रस्त्यावरील खड्डा चुकवताना तोल जाऊन दुचाकीसह रस्त्यावर पडले. यात दुचाकीवर मागे बसलेला युवक महामार्गावरील रस्त्यावर पडला, पाठीमागून आलेला भरधाव डम्पर या तरुणाच्या अंगावरून गेल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भिवंडी कोनगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ब्रिजेशकुमार जैस्वार (रा. उल्हासनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरून भिवंडीतील मानकोली गाव येथे कामानिमित्त आला होता. दुपारी परत मुंबई-नाशिक महामार्गावरून उल्हासनगर येथे घरी जात होता. भिवंडीजवळील रांजणोली चौक परिसरात सदर मोटरसायकल एका खड्ड्यामध्ये आपटल्याने मोटरसायकल स्वारासह गाडी रस्त्यावर पडली, यावेळी मागून येणारा नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव डम्पर ब्रिजेशकुमारच्या अंगावरून गेला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ब्रिजेशकुमार यांस रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघात घडल्यानंतर डम्परचालक पळून गेल्याने मयताचा मित्र राम जनकराम शर्मा याने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी डम्परचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे करीत आहेत.
चौकट
-----------------------------------
खड्डे बुजवण्यासाठी पोलिस रस्त्यावर
मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक-भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यावर खड्डे बुजवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भिवंडी पोलिसांच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले आहे, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज भिवंडीत मोटरसायकल अपघात झाला, ही गंभीर बाब लक्षात घेऊन आज दुपारी भर पावसात कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी आपल्या पोलिस पथकासह रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90227 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..