
झोका खेळताना गळफास लागून ११ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
भिवंडी - आई-वडील कामावर गेले असता घरात मुलांनी विरंगुळा म्हणून झोका खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यावेळी लक्ष ठेवण्यास कोणी मोठी व्यक्ती नसल्याने एका ११ वर्षीय चिमुरडीला आपला प्राण गमवावा लागल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील भादवड गाव पुंडलिक नगर येथे रविवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. वर्षा असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे वडील श्रीजन मोतीलाल गौतम व त्यांची पत्नी असे दोघेही भिवंडीतील सोनाळे येथे मोलमजुरी करून राहतात. त्यांची मुलगी वर्षाकडे ५ वर्षीय मुलगा व दहा महिन्यांची मुलगी सांभाळण्याची जबाबदारी असे.
नेहमीप्रमाणे पती-पत्नी कामावर गेले असता घरात असलेल्या वर्षाने शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसह झोका खेळण्यासाठी घराच्या दरवाजात साडी बांधून झोका तयार केला; परंतु यावर झोका खेळत असताना झोक्याला पिळ देत गिरकी घेतली असता तो पिळ गळ्याला घट्ट बसल्याने वर्षाचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90237 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..