
साथीच्या आजाराचा ताप वाढला
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरात पडत असलेल्या पावसाने तूर्तास विश्रांती घेतली तरी शहरात बदलत्या वातावरणामुळे ताप, अंगदुखी, जुलाब, डेंगी, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळी आजारांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण-डोंबिवली शहरी ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून होत असलेल्या गढूळ पाणीपुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना ताप, कावीळ, टायफॉईड, डेंगी आदींच्या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात साथ रोग पसरू नयेत म्हणून पालिकेचे विविध विभाग एकत्र येऊन आपत्कालीन कृती आराखडा बनवला जातो; मात्र तो कागदावर असल्याचे स्पष्ट होत आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात रस्त्यावर भुर्जीपाव, वडापाव, चायनीज, पाणी पुरी, बर्फ विक्री, सरबत विक्री या गाड्या बंद असणे आवश्यक आहे; मात्र पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे उघड्यावरच पदार्थ विक्री होत असल्याने आता नागरिकांना त्रास होत आहे.
---
दूषित पाणी प्रश्नामुळे आरोग्य धोक्यात
कचरा न उचलणे, जेथे रुग्ण सापडतो त्या परिसरात धूर आणि जंतुनाशक फवारणी करण्याचे काम घनकचरा विभाग वेळेवर करत नसल्याचे समोर आले असून गटार सफाई, नाले सफाईनंतर कचरा नाल्याशेजारी अनेक दिवस पडणे, अनेक ठिकाणी मलनिस्सारण विभागाच्या पाईप लाईन फुटणे, यामुळे दुर्गंधी पसरत आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणी प्रश्न असून, नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. अनेक ठिकाणी इमारतींचे काम सुरू असून, तेथे मोठे खड्डे आणि पाणी साठल्याने मच्छर निर्माण होत आहेत. आजूबाजूच्या परिसरात साथीच्या आजारांची रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, पालिकेच्या दोन रुग्णालये आणि १० आरोग्य केंद्रांत नागरिकांना सेवा दिली जाते.
१ जून ते २२ जुलै या काळात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांमार्फत साथीच्या आजारांची रुग्णसंख्या
गेस्ट्रो ४२
कावीळ १७
टायफाईड ५२
डेंगी १२
लेप्टो १
मलेरिया ४
ताप ३३७१
स्वाईन फ्ल्यू ९
नागरिकांनी उघड्यांवरील अन्न खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, आरोग्याची काळजी घ्यावी, साथीच्या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा पालिका रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
- आरोग्य अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90298 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..