मुंबई पूरमुक्त होणार?, ३५० कोटींच्या प्रकल्पासाठी निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai flood-free Tender of 350 crore project
३५० कोटींच्या माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागर आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

मुंबई पूरमुक्त होणार?, ३५० कोटींच्या प्रकल्पासाठी निविदा

मुंबई : मुंबईचा शहरी भाग पूरमुक्त करण्यासाठी माहुल पम्पिंग स्टेशनच्या कामाकरिताची निविदा प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागर आयुक्तांकडून जागा मिळण्याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केंद्राला लिहिले आहे. केंद्रातील मिठागर आयुक्तांकडे त्याबाबतचा पत्रव्यवहार झाला आहे. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच पालिका नव्याने कामाला लागली आहे. मुंबईतील मध्य आणि पूर्व भागाला पूरमुक्त करण्यासाठी माहुल पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मिठागराची जागा मिळवण्यासाठी सिंह यांनी काही दिवसांपूर्वी वाणिज्य मंत्रालयाकडे पत्र पाठवले आहे. दुसरीकडे पालिकेने निविदा प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे खासगी विकसकाकडून जमीन घेण्याचा प्रकल्प आता बारगळण्याच्या दिशेने आहे. माहुल पम्पिंग स्टेशनमुळे मुंबई शहरातील सायन (गांधी मार्केट), ॲण्टॉप हिल, चुनाभट्टी आदींसारख्या ठिकाणी पाणी तुंबण्याचा विषय मार्गी लागणार आहे. माहुल स्टेशनच्या जागेसाठी पालिका सहा ते सात वर्षांपासून मिठागर आयुक्तांकडे पाठपुरावा करत आहे; परंतु संबंधित जागा उपलब्ध होत नसल्याने काही दिवसांपासून पालिकेने पर्यायी जागेचा शोध सुरू केला होता. मिठागर आयुक्तांकडून जागा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच त्यासाठी पालिकेने आता पत्रव्यवहार सुरू केला आहे. पालिका मिठागराच्या जागेच्या विषयावर थेट केंद्रासोबत पत्रव्यवहार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे माहुल पम्पिंग स्टेशनच्या सहा एकर जागेचा विषय लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

जुन्या चुकांमधून सुधारण्याची गरज!
महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागराच्या जागेत प्रकल्प उभा करण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शहरासाठी आवश्यक अशा प्रकल्पाला गती मिळाल्याने आनंद होत आहे; पण वेळीच जागेचा ताबा मिळवण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याआधीच्या चुकांमधून निविदेची प्रक्रिया रखडणार नाही, अशीच अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अपेक्षित असलेली यंदाची निविदा प्रक्रिया वेळीच पूर्ण होईल, अशी अपेक्षा काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90514 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top