ठाण्यात शिवसेनेचे सहा जिल्हाप्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात शिवसेनेचे सहा जिल्हाप्रमुख
ठाण्यात शिवसेनेचे सहा जिल्हाप्रमुख

ठाण्यात शिवसेनेचे सहा जिल्हाप्रमुख

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा ः हेमलता वाडकर
ठाणे, ता. २७ ः एकाच व्यक्तीवर जिल्ह्याचा कारभार सोपवण्याची चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन ते तीन विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यानुसार ठाण्यातील १८ विधानसभांसाठी किमान सहा ते सात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याची सुरुवात कल्याण डोंबिवलीमधून झाली आहे. येथे अनुक्रमे सदानंद थरवळ आणि चंद्रकांत बोडारे यांना जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. धनुष्यबाण आपल्याकडेच यावे, यासाठी ठाकरे आणि शिंदे गट आपापले शक्तिप्रदर्शन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाची नवीन कार्यकारिणीही बनवली आहे. मात्र, त्याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात पक्षाची मोट घट्ट बांधण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेत पूर्वी जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अशी पदे होती. जिल्हाप्रमुखावरच संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात येत होता. जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर कालांतराने जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रमुखपदी नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली. म्हस्के जिल्हाप्रमुख असले, तरी एकनाथ शिंदे यांचाच एकहुकुमी कार्यक्रम ठाण्यात सुरू असल्याचे बोलले जात होते.

अपेक्षित यश मिळत असल्याने पक्षप्रमुखांनीही त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही; पण या काळात ठाणे आणि ‘मातोश्री’ यांच्यामध्ये दरी निर्माण झाली. ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सोडाच लोकप्रतिनिधींनाही मातोश्रीपर्यंत पोहोचण्यास अटकाव केला गेल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. सत्तांतरानंतर पक्ष फोडाफोडीचे राजकारण सध्या सुरू आहे याला जबाबदार जिल्ह्यातील एकहाती कारभार असल्याचे दिसून आले आहे. म्हणून शिवसेनेची नव्याने बांधणी करताना सर्वप्रथम हा एक हाती कारभार संपुष्टात आणण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याचे समजते.
---------------
असे असेल विभाजन
* ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवाडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून एक जिल्हाप्रमुख असेल. यामध्ये मिरा-भाईंदरही समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
* नवी मुंबईत शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख असून ते ठाकरे गटात आहेत. त्यामुळे तेथे नव्याने नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे.
* रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांची कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
* कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांना बढती देत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
* भिवंडी कल्याण पश्चिम आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र जिल्हाप्रमुख असेल.
* भिवंडी ग्रामीण आणि उर्वरित परिसरासाठीही जिल्हाप्रमुखाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
------------
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
कल्याण डोंबिवलीतील कट्टर शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. शिंदे गटात जे गेले ते इतर पक्षातून आलेले आयाराम गयाराम होते. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीने पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करणार असून पक्षप्रमुखांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
- सदानंद थरवळ
------
जबाबदारी जबाबदारीने पार पाडणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी जबाबदारीने पार पाडण्याची ग्वाही देतो. जे पक्ष सोडून गेले ते संधीसाधू होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दगा दिला आहे. त्यांना त्यांची चूक लवकरच कळेल.
- चंद्रकांत बोडारे
-----------
डोंबिवली शहरप्रमुखपदी खामकर
जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करताना पक्षप्रमुखांनी शहरप्रमुखपदाची जबाबदारी विवेक खामकर यांच्यावर सोपवली आहे; तर कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी शरद पाटील यांची निवड केली आहे. दरम्यान, कल्याण पूर्व सहसंपर्कप्रमुखपदी रमेश जाधव यांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90531 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top