
कल्याणमध्ये अल्पवयीन सायकल चोरांना अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः कल्याण शहरात महागड्या सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील सीसी टीव्ही पिंजून काढले होते. याच्या आधारे सायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुले व सोसायटीचा वॉचमन सॅंड्रीक एबीनीझर (वय ५९) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीच्या एकूण १४ महागड्या सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महागड्या सायकली चोरीला जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले होते. याप्रकरणी कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील व पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने शहरातील सीसी टीव्ही फुटेज तपासले होते. यामध्ये १५ ते १६ वर्षांची दोन मुले विविध ठिकाणच्या सायकल चोरून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक गस्त घालत असताना एक अल्पवयीन मुलगा सायकलवर जाताना दिसला. सीसी टीव्हीमध्ये हा मुलगा पोलिसांना आढळून आला होता. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने व त्याच्या मित्राने सायकल चोरून वॉचमनचे काम करणारा सॅंड्रीक याच्याकडे त्या ठेवण्यासाठी दिल्याचे कबूल केले. हा वॉचमन सोसायटीच्या आवारात सायकल ठेवून नंतर त्यांची दोन ते तीन हजाराला विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला. सॅंड्रीकला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून अल्पवयीन मुलांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90538 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..