
भिवंडीत १३० किलो मंगूर मासे जप्त
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : मंगूर मासे विक्री करणे, त्याचे प्रजनन व मत्स्यपालन करण्यावर बंदी असताना भिवंडी शहर व ग्रामीण भागात या माशांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. शहरातील तीन बत्ती परिसरात असलेल्या भाजीपाला व मच्छी मार्केटमध्ये या मंगूर माशांची गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे विक्री सुरू असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी केली होती. त्यानंतर पालिकेचे मार्केट विभाग प्रमुख गिरीष घोष्टेकर यांनी पथकासह भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवलेले सुमारे वीस हजार रुपये किमतीच्या १३० किलो माशांचा साठा जप्त केला. पालिकेने प्रथमच केलेल्या या कारवाईमुळे मच्छी मार्केट व भाजीपाला मार्केटमध्ये खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी पारित केलेल्या आदेशानुसार मंगूर मासे, त्याचे प्रजनन व मत्स्यपालन करण्यावर बंदी घातली असून, या प्रतिबंधित मंगूर माशांचे अस्तित्वात असलेले साठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु बंदी असूनदेखील मंगूर मासे भिवंडी शहर परिसरात छुप्या पद्धतीने बाजारात विकण्याकरता येत असल्याचे आढळून आले. त्याबाबत काही नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्यामुळे त्यांनी या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश मार्केट विभागाला दिले. तीनबत्ती येथील मच्छी मार्केटमध्ये मो. सलीम मोहम्मद शरीफ मोमीन व रहमान शेख हे दोन विक्रेते लपून मंगूर मासे विकत असल्याचे मार्केट विभाग प्रमुख गिरीष घोष्टेकर, आरोग्य निरीक्षक दीपक भोईर, कांचन सोनावणे यांच्या पथकास तपासणीमध्ये आढळून आले. त्यामुळे त्यांनी या दोन व्यापाऱ्यांकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीचे १३० किलो मंगूर मासे जप्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90562 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..