
वयाच्या पन्नासाव्या वर्षी मिलिटरी प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : वयाची पन्नाशी गाठलेली असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डोंबिवलीतील विदुला साठे यांनी एनसीसीचे खडतर असे मिलिटरी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते पूर्ण केल्यानंतर आता विदुला या फर्स्ट ऑफिसर झाल्या आहेत. विदुला या टिळकनगर शाळेत एनसीसी ऑफिसर आणि अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विदुला यांनी २३ ते २४ दिवसांचे ओटीए (ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी) ग्वाल्हेरमधील एनसीसीचे मिलिटरी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. १९९९ मध्ये दिवंगत प्राचार्य सुरेंद्र वाजपेयी यांच्या प्रयत्नाने टिळकनगर शाळेत मुलींसाठी एनसीसी सुरू झाली. शाळेत मुलींची एनसीसी ऑफिसर म्हणून माजी प्राचार्य लीना ओक मॅथ्यू यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. लीना यांनी २००९ पर्यंत ही जबाबदारी उत्तम सांभाळली. २००९ साली शाळेच्या माजी विद्यार्थिनी व अध्यापिका विदुला यांनी ही जबाबदारी हाती घेतली. आज मुलींच्या एनसीसीला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. एनसीसीमधील अनेक कॅडेटसनी राज्य, राष्ट्रीय कॅम्पसमधून स्पृहणीय यश मिळविले आहे.
एनसीसी हे शैक्षणिक संस्थेचे वैभव
देशप्रेम, सहकार्य, आदरभाव, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, स्वावलंबन, एकाग्रता, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शक्ती, निर्णयक्षमता, शिस्त असे अनेक गुण एनसीसी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागतात व त्यांचे व्यक्तिमत्त्व घडते. म्हणूनच एनसीसी हे शैक्षणिक संस्थेचे वैभव आहे. अतिशय शिस्तप्रिय व कामावर निष्ठा असलेले चिफ ऑफिसर एन. बी. चौधरी आणि फर्स्ट ऑफिसर विदुला साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलांची व मुलींची एनसीसी उत्तमपणे सुरू आहे. विदुला यांच्या या यशामुळे त्यांचे शाळेतून कौतुक केले जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90583 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..