
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास
प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर, ता. ३० : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, येत्या ३ ऑगस्टला होणाऱ्या महासभेपुढे तो मान्यतेसाठी येणार आहे. सध्या शालेय, तसेच महाविद्यालयीन सर्वच विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जात आहे. मात्र, महापालिकेच्या विद्यार्थ्यांना यापुढे मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
महापालिकेच्या ३६ शाळांमधून सुमारे आठ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वर्षी महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे शाळांच्या पटसंख्येत सुमारे दोन हजारांनी वाढ झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश, वह्या, दप्तर, बूट आदी मोफत दिले जातात. आता या वर्षीपासून विद्यार्थ्यांना बसचा प्रवासही मोफत देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शाळांमधील बहुतांश विद्यार्थी गरीब घरांतील आहेत. या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास दिल्यास त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.
सध्या महापालिकेची परिवहन सेवा महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवली जात आहे. महापालिकेने कंत्राटदाराशी केलेल्या करारानुसार कंत्राटदाराला सेवा चालवता मिळणारे उत्पन्न व देखभालीसाठी होणारा खर्च यात येणारी तफावत महापालिकेने भरून द्यायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस प्रवास मोफत दिल्यानंतर कंत्राटदाराचे जे नुकसान होणार आहे, त्याची भरपाई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडून केली जाणार आहे.
लवकरच तीस ई-बसची खरेदी
महापालिकेच्या ताफ्यात सध्या एकंदर ७४ बस असून, यातील ७० बस विविध १९ मार्गांवर धावत आहेत. महापालिकेकडून नियमितपणे सुरू असलेली बसची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व तत्पर सेवा यामुळे प्रवाशांकडून महापालिकेच्या परिवहन सेवेला पसंती मिळत असून आता या परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ७५ हजारांहून अधिक झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेकडून लवकरच तीस ई-बसची खरेदी देखील केली जाणार आहे.
---------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90758 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..